पुण्यातला ‘अर्धनारीनटेश्वर’ प्रसंग ! नाव रवींद्ररावांचे आणि फोटो फॅन्सी साडीतल्या बाईचा!

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा आखाडा सध्या चांगलाच तापला आहे. पण या तापलेल्या वातावरणात पुण्याच्या निवडणूक विभागाने असा काही ‘थंडावा’ दिला आहे की, साक्षात ब्रह्मदेवालाही आपल्या सृष्टीनिर्मितीचा विसर पडेल! पुण्यातले ६५ वर्षांचे आमचे तरुण मित्र रवींद्रराव मोठ्या उत्साहात मतदानाला गेले. कपाळावर टिळा, अंगात इस्त्रीचा नेहरू शर्ट आणि मनात लोकशाहीचं देणं देण्याची जिद्द! पण मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांच्यासमोर जो ‘चमत्कार’ घडला, त्याने रवींद्ररावच काय, पण खुद्द कैलासपतीही थक्क झाले असते.
पुरुष देही, स्त्रीचा फोटो! रवींद्ररावांनी यादीत नाव शोधलं. नाव बरोबर, पत्ता बरोबर, वय बरोबर… पण त्यांच्या नावापुढे जो फोटो होता, तो पाहून रवींद्ररावांच्या पायाखालची जमीनच सरकली! समोर चक्क एका फॅन्सी साडीतल्या अनोळखी महिलेचा फोटो हसऱ्या चेहऱ्याने त्यांचं स्वागत करत होता. ज्या वयात माणसाला स्वतःची ओळख पटवून द्यायला आरशाची गरज लागते, तिथे निवडणूक आयोगाने रवींद्ररावांना चक्क ‘स्त्री’ ठरवून टाकलं होतं. अहो, पुण्याच्या या निवडणूक अधिकार्यांना इतकीही दृष्टी नसावी? की पुरुषाचा चेहरा आणि बाईचा फोटो एकत्र करून त्यांनी कुठला नवा ‘अर्धनारीनटेश्वर’ अवतार शोधून काढला आहे?
अधिकाऱ्यांची ‘ढिम्म’ वृत्ती! रवींद्ररावांनी विचारलं, “अहो, हा फोटो कोणाचा? मी काय तुम्हाला साडी नेसलेला दिसतोय का?” तर अधिकारी साहेब डोळ्यावरची चष्म्याची काच पुसत निर्विकारपणे म्हणाले, “यादीत जे आहे, तेच सत्य!” काय सांगावं या सरकारी अक्कलशून्यतेचं? नावावरून माणूस पुरुष आहे हे स्पष्ट कळत असताना, केवळ फोटो चुकीचा आहे म्हणून एका मतदाराला वेठीस धरणं, हा तर लोकशाहीचा अपमानच!
आधारचा ‘आधार’ आणि विजय! अखेर, संतापलेल्या रवींद्ररावांनी घरी धाव घेतली. पुण्याच्या भर उन्हात धावत जाऊन आपलं ‘पुरुषत्व’ सिद्ध करण्यासाठी त्यांना ‘आधार कार्ड’ आणावं लागलं. जेव्हा त्यांनी ते सरकारी कागद त्यांच्यासमोर आदळलं, तेव्हा कुठे त्या सुस्त अधिकार्यांचे डोळे उघडले. चूक मान्य झाली आणि मग कुठे रवींद्ररावांच्या बोटाला लोकशाहीची शाई लागली.
आमचा सवाल! पुणे महानगरपालिकेच्या या अनागोंदी कारभारावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही? आज रवींद्ररावांनी जिद्दीने मतदान केलं, पण अशा सावळ्या गोंधळामुळे कित्येक मतदार हताश होऊन घरी परतले असतील. निवडणूक आयोगाच्या या अजब किमयेमुळे लोकशाहीचाच चेहरा विद्रूप होतोय, हे या निगरगट्ट प्रशासनाला कधी कळणार?





















