विजयी असा की पराभूत ; व्यसनमुक्तीच्या मैदानात उतरा…! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ अन् डॉ. सलीम आळतेकर टीमचा २०२६ चा ‘इचलकरंजी पॅटर्न..’!

इचलकरंजी : निवडणुकीचा धुराळा उडाला, कुणी गुलाल उधळला तर कुणी पराभवाचा विरंगुळा शोधला. पण राजकारणाच्या या जत्रेत समाजाला लागलेली व्यसनांची ‘वाळवी’ साफ करायची कुणाला आठवण आहे का? हाच रोकठोक सवाल विचारत, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ पुणे आणि डॉ. सलीम आळतेकर यांच्या टीमने इचलकरंजीत नशामुक्तीचा शंखनाद केला आहे. २०२६ च्या शुभ आगमनाचे निमित्त साधून, या टीमने थेट लोकप्रतिनिधींच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांना त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

सत्ता येवो वा जावो, व्यसनमुक्ती झालीच पाहिजे!

मराठी चित्रपट अभिनेते महमद रफीक सर, डॉ. सलीम आळतेकर आणि अनिस जमादार यांच्या मार्गदर्शना खाली या नशामुक्ती टीमने इचलकरंजी महापालिकेच्या निवडक नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन तर केलेच, पण त्याचबरोबर पराभूत उमेदवारांनाही समाजकारणाच्या प्रवाहात खेचले आहे. “जिंकलात म्हणून हुरळून जाऊ नका आणि हरलात म्हणून घरी बसू नका; कारण खऱ्या अर्थाने समाज घडवण्याची लढाई आता सुरू झाली आहे,” अशा शब्दांत डॉ. आळतेकर यांनी सर्वांना आवाहन केले.
काय आहे हा ‘इचलकरंजी पॅटर्न २०२६’?
केवळ भाषणे देऊन न थांबता या टीमने दोन अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी संकल्प नगरसेवकांसमोर मांडले आहेत: १. व्यसनमुक्त प्रभाग: प्रत्येक नगरसेवकाने आपला प्रभाग दारू, गांजा आणि अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे. २. पिरीयड केअर सेंटर (Period Care Centre): प्रभागातील माता-भगिनींच्या आरोग्यासाठी हक्काची केंद्रे सुरू करणे.

या दोन्ही केंद्रांच्या उभारणीसाठी आणि अंमलबजावणी साठी ‘नशा मुक्ती अभियान महाराष्ट्र’चे तज्ज्ञ डॉक्टर्स, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या अनुभवाचे व प्रशिक्षणाचे गाठोडे घेऊन सज्ज आहेत
नगरसेवकांनो, आता तुमची ‘कसोटी’ आहे..!
डॉ. सलीम आळतेकर यांनी अत्यंत कडक शब्दांत सुनावले आहे की, हे केवळ एक शिष्टाचार भेट नाही, तर हे एक आवाहन आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला मोठे केले, त्यांच्या घराघरात सुख-शांती नांदायची असेल तर तिथले व्यसन हद्दपार झालेच पाहिजे. नगरसेवकांनी या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि शिबिरे घ्यावीत, असे आवाहन टीमने केले आहे.
लोकहो, राजकारण तर पाच वर्षांतून एकदा येते, पण समाजकारण रोज करावे लागते! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आणि डॉ. आळतेकरांनी , अनिस जमादार हा जो ‘इचलकरंजी पॅटर्न’ मांडला आहे, तो केवळ इचलकरंजीसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे. आता बघुया, किती नगरसेवक या सामाजिक यज्ञात आपल्या कर्तव्याची समिधा अर्पण करतात!”
इचलकरंजीला व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न करण्याचा हा संकल्प २०२६ च्या पूर्वसंध्येला एक मोठी लोकचळवळ म्हणून उभा राहत आहे.




























