इचलकरंजीत चुली पेटवायच्या की कपाळमोक्ष करून घ्यायचा?
गॅस वितरकांचा ‘चावटपणा’ आणि नेत्यांची लाचारी ; मँचेस्टरच्या कष्टकऱ्यांचा अंत पाहू नका!
गजानन शिरगावे :
इचलकरंजी : महाराष्ट्राचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आज यंत्रमागाचा खडखडाट नाही, तर रिकाम्या सिलेंडरचा भीषण खडखडाट ऐकू येत आहे! इचलकरंजीच्या गल्लीबोळात आज हातावरचे पोट असणारा विणकर आणि कष्टकरी आपला कामधंदा सोडून, खांद्यावर रिकामी टाकी घेऊन एखाद्या गुन्हेगारासारखा गॅस एजन्सीच्या दारात उभा आहे. हा ‘चावटपणा’ नेमका कोणाचा? हा सिलेंडरचा तुटवडा निसर्गाने निर्माण केला आहे की इथल्या गब्बर वितरकांनी आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी कृत्रिमरीत्या लादला आहे? असा जळजळीत सवाल आज इचलकरंजीचा सामान्य नागरिक विचारत आहे.
वितरकांची मुजोरी अन् सामान्यांची लूट!
इचलकरंजीतील गॅस वितरकांनी जणू काही या शहराला आपली जहागिरी समजायला सुरुवात केली आहे. “गॅस नाही, गाडी आली नाही, सर्व्हर डाऊन आहे” अशी पोपटपंची करून सामान्य ग्राहकांना ताटकळत ठेवले जात आहे. पण दुसरीकडे, याच वितरकांच्या मागील दाराने रात्रीच्या अंधारात सिलेंडरचा ‘काळाबाजार’ राजरोसपणे सुरू आहे. ज्याला हक्काचा गॅस हवा त्याला ‘नाही’ म्हणायचे आणि जो जादा पैसे मोजायला तयार आहे त्याला घरपोच सिलेंडर द्यायचा, हा कसला न्याय? हा वितरकांचा माज आता इचलकरंजीकरांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे.
कामधंदा सोडून रांगेत सडायचे का?
शहरातील कष्टकरी आणि गृहिणींना आपले रोजचे काम सोडून तासनतास गॅस एजन्सीच्या दारात उभे राहावे लागत आहे. दिवसाची मजुरी बुडवून गॅस मिळवण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ या मँचेस्टरच्या कामगारांवर आली आहे. रिकाम्या सिलेंडरच्या रांगा पाहून कोणाचेही हृदय पिळवटून निघेल, पण इथल्या प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे कातडे गेंड्यासारखे जाड झाले आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
स्थानिक नेते झोपलेत की त्यांना गॅसचा वास येत नाही?
निवडणुकीच्या वेळी “आम्ही तुमचे कैवारी” म्हणत घराघरात डोकावणारे स्थानिक नेते आता कोठल्या बिळात दडून बसले आहेत? जनतेच्या चुली पेटत नाहीत, गोरगरिबांचे हाल होत आहेत, पण एकाही नेत्याला या मुजोर वितरकांच्या कॉलरला धरून जाब विचारण्याची हिंमत का होत नाही? सामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळत असताना, हे नेते केवळ सवंग लोकप्रियतेच्या राजकारणात मश्गूल आहेत. या नेत्यांनी जर आता लक्ष दिले नाही, तर हाच जनता जनार्दन आगामी काळात तुम्हाला ‘थंडा’ केल्याशिवाय राहणार नाही!
मुसक्या आवळा, अन्यथा संताप उसळेल!
नागरिकांमधून आता एकच गर्जना होत आहे – “या काळ्याबाजार करणाऱ्यांचे हात मुळापासून छाटले पाहिजेत आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत!” प्रशासनाने त्वरित इचलकरंजीत धाड टाकून या वितरकांचे हिशोब तपासले पाहिजेत. जर लवकरात लवकर सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर इचलकरंजीची जनता रस्त्यावर उतरून या व्यवस्थेचा ‘कपाळमोक्ष’ केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आता स्पष्ट झाला आहे.



























