लाल फितीचा फास सुटला, सातबाराचा त्रास मिटला! मालगावच्या समाधान शिबिरात ‘अनाथांना’ मिळाला आधार !

(अशोक मासाळ )
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मालगाव (ता. मिरज) येथील ‘मंगलधाम’ सभागृहात आज लोकशाहीचा खरा उत्सव साजरा झाला! शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘समाधान शिबिरा’ने सामान्य जनतेच्या फाईलींना लागलेली वाळवी झटकली आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न एकाच छताखाली मार्गी लावले.

प्रशासनाचा ताफा जनतेच्या दरबारी !
आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिस नायकवडी आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात प्रशासनाने आपला ‘मानवी चेहरा’ दाखवून दिला. प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या नियोजनाखाली महसूल, कृषी, भूमी अभिलेख आणि आरोग्य अशा सर्वच विभागांनी आपली यंत्रणा मिरज तालुक्याच्या या महत्त्वाच्या केंद्रात राबवली.
काय घडले या ‘क्रांती’ शिबिरात ?
शेतकऱ्यांचा वनवास संपला: सातबारातील दुरुस्त्या आणि शेत पानंद रस्त्यांचे प्रश्न जागेवर सोडवून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याचे काम झाले.
निराधारांना आधार : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या भविष्याची चिंता मिटवली गेली.
योजनांचा पाऊस : आयुष्मान कार्ड, पीएम किसान आणि कृषी विभागाच्या विविध सवलतींचे वाटप थेट जनतेच्या हातात करण्यात आले.
यावेळी मालगाव (ता. मिरज) मंडळातील मल्लेवाडी, गुंडेवाडी, टाकळी, बोलवाड आणि संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील आणि विविध विकास सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रास्ताविकातून या मोहिमेचा मूळ हेतू मांडला, तर ग्राम महसूल अधिकारी संजय खरात यांनी सर्वांचे आभार मानले.
थोडक्यात, मालगावचे हे शिबिर म्हणजे निव्वळ सरकारी सोहळा नव्हता, तर तो पिचलेल्या जनतेच्या दुःखावर फुंकर घालणारा एक ‘मानवतावादी’ यज्ञ ठरला!



























