देहूरोडच्या नरकयातना थांबवा , अन्यथा गाठ माझ्याशी ! खासदार श्रीरंग बारणे दिल्लीत कडाडले
संरक्षण विभागाकडे निधीचा जोरदार तगादा
पिंपरी/देहूरोड: चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रखडलेली विकासकामे आणि नरकयातना भोगणाऱ्या नागरिकांच्या सहनशक्तीचा आता अंत झाला आहे. “पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांसाठी जनतेला किती काळ वेठीस धरणार? तातडीने निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र संघर्ष करावा लागेल,” अशा शब्दांत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाच्या महानिदेशक शोभा गुप्ता यांना ठणकावून सांगितले.
प्रशासकीय अनास्थेवर ओढले कोरडे
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत ड्रेनेज, पथदिवे आणि स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विशेषतः महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी होणारा त्रास आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट यावर खासदार बारणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. “बोर्डाच्या हद्दीत रस्ते नाहीत, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना कच्च्या रस्त्यावरून कसरत करावी लागते, हे चित्र भूषणावह नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पगाराविना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा टाहो
केवळ विकासकामेच नव्हे, तर पाणीपुरवठा, शिक्षण आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली विझण्याची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणीही त्यांनी या बैठकीत केली.
विकासाचा ‘मावळ’ पॅटर्न आणि महत्त्वाच्या मागण्या:
पालखी मार्गाचे भाग्य उजळणार: श्री क्षेत्र देहूगाव ते देहूरोड पालखी मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करून वारकऱ्यांची सोय करावी.
वाहतूक कोंडीतून सुटका: सेंट्रल चौकात उड्डाणपूल उभारून वाहनचालकांना दिलासा द्यावा.
स्मारके आणि उद्याने: देहूरोड बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि स्व. मीनाताई ठाकरे उद्यानाचा विकास करण्यासाठी खासदार निधीतून काम करण्याच्या प्रस्तावावर चर्चा.
क्रीडा व आरोग्य: शीतळानगर परिसरात उद्यान, योग केंद्र, गोशाळा आणि युवकांसाठी धावपट्टी (रनिंग ट्रॅक) विकसित करणे.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहर प्रमुख दीपक बाबुराव चौगुले व संदीप बंडू बालघरे यांनी शिवस्मारक आणि उद्यानासाठी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर खासदारांनी भर दिला.




























