इचलकरंजीच्या रस्त्यावर आता ‘स्त्री-शक्ती’चे सुदर्शन चक्र ; पिंक रिक्षाचा थाट, अबला झाली आता रस्त्याची सम्राट !


इचलकरंजीच्या रस्त्यावर आता ‘स्त्री-शक्ती’चे सुदर्शन चक्र ; पिंक रिक्षाचा थाट, अबला झाली आता रस्त्याची सम्राट !

इचलकरंजी : गजानन शिरगावे ;

अहो, इचलकरंजीकरांनो, आता डोळे पुसून नीट बघा! ज्या हातांनी आजवर पाळण्याची दोरी ओढली आणि ज्या हातांनी स्वयंपाकघरात पोळ्या लाटल्या, तेच हात आता रिक्षाचे हँडल धरून इचलकरंजीच्या रस्त्यावर सुसाट सुटणार आहेत! कालपर्यंत ‘अबला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या भगिनींनी आज हातात स्टेअरिंग घेतलंय आणि समाजाच्या जुनाट मानसिकतेला थेट ‘ओव्हरटेक’ केलंय!

इचलकरंजीच्या कापडनगरीत काल एक नवा इतिहास घडला. इनरव्हील क्लबच्या रणरागिणींनी पुढाकार घेतला आणि चक्क ‘महिला पिंक ऑटो रिक्षा’ सेवेचा श्रीगणेशा केला. एखाद्या ढाण्या वाघासारखी रिक्षा चालवणारी महिला जेव्हा रस्त्यावरून जाईल, तेव्हा बघणाऱ्यांची मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. हे केवळ रोजगाराचं साधन नाही, तर तो पुरुषी अहंकाराला दिलेला एक सणसणीत टोला आहे!

या सोहळ्याला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी हजेरी लावून या नव्या पर्वाचं कौतुक केलं. इंगवले साहेब म्हणाले, “महिलांनी चौकटी मोडल्या, हे पाहून छाती अभिमानानं फुलून येते.” अहो, खरंच आहे! रस्ता कुणाच्या मालकीचा नसतो, तो जिद्दीने धावणाऱ्याचा असतो; मग तो पुरुष असो वा नारी! आता महिला प्रवाशांना कुणाची भीती बाळगायचं कारण नाही, कारण रिक्षाच्या सीटवर त्यांचीच ‘ताई’ किंवा ‘माई’ बसलेली असणार!

या ऐतिहासिक प्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विभा पाटणी, ईशा खंडेलवाल, शशी सिंगवी, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे, शब्बीर बोजगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. महिलांना केवळ परवाना दिला नाही, तर त्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम या संस्थेनं केलंय.

एकूणच काय, तर या रिक्षा फक्त ‘पिंक’ रंगाच्या नाहीत, तर त्या महिलांच्या आत्मविश्वासाचा गुलाबी गुलाल आहेत! इचलकरंजीत आता ट्रॅफिक जाम झाला तरी चालेल, पण या भगिनींचा प्रगतीचा प्रवास मात्र ‘फुल्ल स्पीड’मध्ये सुरू राहिला पाहिजे. उद्या जर कुणी विचारलं, “कुठे चाललात?” तर अभिमानाने उत्तर मिळेल, “आमच्या ताईच्या रिक्षातून स्वाभिमानाच्या प्रवासाला निघालोय!”

विजयाचा हा ‘हॉर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात घुमू दे, हीच सदिच्छा!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!