मंत्र-तंत्राच्या बाजारात विकली गेली लोकशाही ! ३९ ‘आमदार’ की भोंदूचे ‘चोपदार’?


मंत्र-तंत्राच्या बाजारात विकली गेली लोकशाही ! ३९ ‘आमदार’ की भोंदूचे ‘चोपदार’?

संविधानाची शपथ विसरून खरातच्या पायावर लोळणाऱ्या ‘त्या’ ३९ नामर्दांना तातडीने घरचा रस्ता दाखवा; माकपचा नांदेडात वज्रनिर्धार !

नांदेड (जैमोदीन पटेल) :

ज्या महाराष्ट्राने गाडगे बाबांचा झाडू पाहिला आणि तुकडोजी महाराजांची खंजिरी ऐकली, त्याच मातीत आज लोकशाहीच्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या डोक्यावर भोंदूगिरीचे भूत स्वार व्हावे, यापेक्षा मोठे विडंबन दुसरे कोणते असू शकते? संविधानाचे रक्षकच जेव्हा एका भोंदूच्या तंत्र-मंत्राचे भक्षक होतात, तेव्हा या पुरोगामी राज्याचा श्वास गुदमरायला लागतो. अशोक खरात नावाच्या एका भोंदूच्या चरणी राज्याचे ३९ आमदार आणि वरिष्ठ अधिकारी लोळण घेत आहेत, ही बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला अ‍ॅसिड हल्लाच आहे! या लोकशाहीच्या ‘कलंकांना’ आणि अज्ञानाच्या पुतळ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखवा, अशी गर्जना करत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले ‘लाल वादळ’ धडकवले.

आमदार की अज्ञानाचे पुतळे ?

लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचा दीपस्तंभ असतो, पण येथे तर अंधाराचेच साम्राज्य पसरले आहे. खरातच्या जादूटोण्याला शरण गेलेल्या त्या ३९ ‘नामर्दांची’ यादी सरकारने तात्काळ जाहीर करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना राजकारणातून हद्दपार करावे, अशी आक्रमक मागणी माकपने केली आहे. संविधानाने ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी दिली, तेच जर लिंबू-तिंबाच्या आणि तंत्र-मंत्राच्या आहारी जात असतील, तर यांना ‘माननीय’ म्हणायचे तरी कसे? या अधिकाऱ्यांची आणि आमदारांची लायकी केवळ भोंदूंचे पाय चेपण्याचीच उरली आहे का, असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे.

महिलांच्या अब्रूशी खेळणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा !

अशोक खरात या भोंदूने केवळ अंधश्रद्धाच पसरवली नाही, तर अनेक निष्पाप महिलांचे शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहेत. हे पाप केवळ त्या भोंदूचे नाही, तर त्याला राजाश्रय देणाऱ्या त्या ३९ आमदारांचेही आहे. हे व्हिडिओ तात्काळ हटवून महिलांची सामाजिक प्रतिष्ठा वाचवा, अन्यथा हे आंदोलन मंत्रालयाचे उंबरठे ओलांडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ करा !

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करा, या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना धाडण्यात आले. सोशल मीडियावरून भोंदूगिरीचा आणि ज्योतिषांचा बाजार मांडणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नांदेडात लाल बावट्याचा कडकडाट! सोमवार ६ एप्रिल रोजी नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात माकपने तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभने, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. गंगाधर गायकवाड, जिल्हा कमिटी सदस्या कॉ. उज्वला पडलवार, कॉ. लता गायकवाड यांच्यासह कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. मीना आरसे, डॉ. आदिनाथ इंगोले, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. सचिन वाहूळकर, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. राहुल नरवाडे, कॉ. सोनाजी कांबळे, कॉ. दिगंबर घायाळे यांनी केले.

आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे. या ३९ आमदारांना पाठीशी घालून सरकार स्वतःचेच तोंड काळे करून घेणार की या ‘राजमान्य’ भोंदूगिरीचा नायनाट करणार? जनतेचा डोळा आता या निर्णयाकडे लागला आहे!



32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!