न्यायदेवतेचा ऐतिहासिक प्रहार : कोठडीत रक्त सांडणाऱ्या नऊ पोलिसांना एकाच वेळी फाशी !
सुनिल पाटील :
मदुराई – ज्या हातांनी कायद्याचे रक्षण करायचे, त्याच हातांनी कायद्याचा गळा घोटला! लॉकडाऊनच्या काळात माणुसकी विसरून एका बापा-लेकाचा कोठडीत अमानुष बळी घेणाऱ्या नऊ पोलीस नराधमांना आज मदुराई न्यायालयाने फाशीच्या सुळावर चढवण्याचे ऐतिहासिक फर्मान सोडले आहे. वर्दीचा माज आणि सत्तेची नशा जेव्हा डोक्यात जाते, तेव्हा न्यायदेवता कशी तलवार उपसते, याचे हे जळजळीत उदाहरण आहे.
काय घडले होते त्या काळरात्री..?
२०२० सालच्या त्या भीषण लॉकडाऊनमध्ये जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांनी साधे मोबाईलचे दुकान पाच मिनिटे उशिरा उघडले, म्हणून या खाकी वर्दीतल्या लांडग्यांनी त्यांना उचलून नेले. रात्रभर कोठडीत जो नंगानाच झाला, त्याने अवघा देश हादरला होता. काठ्यांनी रक्तामांसाचा गोळा होईपर्यंत त्या दोघांना मारहाण करण्यात आली. तपासाचे सीसीटीव्ही फुटेज पुसून पुरावे नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला, पण रक्ताचे डाग सत्याची साक्ष देत होते.
आज न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, हे केवळ कोठडीतले मृत्यू नसून पोलिसांच्या क्रूरतेचा कळस आहे. तपासादरम्यान एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला, पण उरलेल्या नऊ जणांना न्यायालयाने यमाच्या दारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
यांना झाली फाशी:
निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक रघु गणेश, बालकृष्णन यांच्यासह मुरुगन, समिदुराई, मुथुराज, चेल्लादुराई, थॉमस फ्रान्सिस आणि वेलुमुथू या नऊ जणांना आता त्यांच्या पापांची शिक्षा फासावर लटकून भोगावी लागणार आहे.
> “पोलीस जेव्हा रक्षक न राहता भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कायद्याचा फास हाच एकमेव पर्याय असतो. आज जयराज आणि बेनिक्स या पिता-पुत्राच्या रक्ताचा थेंब न थेंब हिशोब चुकता झाला आहे. खाकी वर्दीतल्या गुंडगिरीला हा सणसणीत चपराक आहे!”




























