अमित कर्तृत्वाला निष्ठेचं कोंदण; सांगलीच्या महापालिकेत शहा-पर्व सुरू !

सांगली, प्रतिनिधी – अशोक मासाळ
ज्या मातीने अनेक मुत्सद्दी आणि झुंजार नेतृत्वं दिली, त्याच सांगलीच्या महापालिकेत सध्या एका नावाचा डंका वाजतो आहे आणि ते नाव म्हणजे अमितसिंह शहा! सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अमितसिंह शहा यांची झालेली निवड ही केवळ एक राजकीय नियुक्ती नसून, ती सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या मूल्यांना मिळालेली अधिकृत मान्यता आहे. आजच्या ‘आयाराम-गयारामांच्या’ आणि सोयीच्या राजकारणाच्या काळात, वाऱ्याची दिशा पाहून न बदलता निष्ठेचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणाऱ्या एका ध्येयवेड्या कार्यकर्त्याचा हा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान आहे.
अमितसिंह शहा यांचा राजकीय प्रवास हा एकनिष्ठता, सातत्य आणि संघर्षाचा राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता त्यांनी काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा अभेद्य राखली. सत्तेसाठी तत्त्वं गहाण ठेवणाऱ्यांच्या गर्दीत शहा यांनी जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या याच कार्यशैलीची दखल घेत महापालिकेने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले शहा, आता महापालिकेत आपल्या कार्याचा नवा ठसा उमटवतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
आजच्या बदलत्या काळात नगरसेवक हा केवळ प्रशासकीय प्रतिनिधी नसून, तो समाजाच्या सर्वांगीण विकासाचा शिल्पकार असणे गरजेचे आहे. शहा यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या मूलभूत सुविधा, प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या नव्या संकल्पनांना नक्कीच गती मिळेल. पारदर्शकता, सामाजिक समता आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया ही त्यांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे युवकांसाठी एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
नगरसेवकपद ही केवळ सन्मानाची बाब नसून ती जबाबदारीची जाणीव करून देणारी भूमिका आहे. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करताना मूल्याधिष्ठित राजकारण आणि विकास यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मात्र, शहा यांच्या व्यक्तिमत्त्वातील संघर्षशीलता पाहता, ते जनहिताच्या दृष्टीने ही नवी ‘इनिंग’ यशस्वीपणे खेळतील यात शंका नाही.
या सुवर्णक्षणी मासाळ परिवार, गुंडेवाडी यांच्या वतीने अमितसिंह शहा यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या या नव्या जबाबदारीतून सांगलीच्या विकासाचे नवे आदर्श निर्माण होतील आणि जनतेला हक्काचा प्रतिनिधी लाभेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.



























