महामेट्रोचा ‘४१ हजार’ झाडांचा फार्स की वनीकरण? साहेब, खड्डा नक्की खणायचा कुठे ?
पुण्याच्या रस्त्यांवर सध्या मेट्रोचे खांब आणि राजकारण्यांचे ‘शुभेच्छुक’ फ्लेक्स यांच्यात कोण जास्त उंच, याची चढाओढ लागली असतानाच महामेट्रोचे सारथी मा. श्रवण हर्डीकर साहेबांनी पर्यावरणाचा एक मोठा ‘बॉम्ब’ टाकला आहे. तो म्हणजे ४१ हजार झाडे लावण्याचा आणि पुढची सात वर्षे त्यांचे ‘पाळणाघर’ चालवण्याचा! या निर्णयामुळे पुण्यातली मुंग्यांपासून मुन्सिपालटीपर्यंतची सगळी मंडळी सुखावली खरी, पण शंकांच्या काही ‘पुणेरी पाट्या’ मात्र आता मेट्रोच्या खांबावरही झळकू लागल्या आहेत.
मुळात ४१ हजार हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो. पण प्रश्न असा आहे की, हर्डीकर साहेब, ही ४१ हजार झाडं नक्की लावायची कुठं? मेट्रोच्या निविदेत झाडांचा आकडा एखाद्या नटाच्या मानधनासारखा फुगलेला दिसतोय, पण त्यांचा ‘नकाशा’ मात्र एखाद्या गुप्त खजिन्यासारखा दडवून ठेवला आहे की काय, अशी शंका येते. पुणेकरांना भीती आहे की, उद्या ही झाडं लावायला जागाच उरली नाही, तर महामेट्रो ती झाडं लोकांच्या गॅलरीत किंवा मेट्रोच्या डब्यात तर टांगणार नाही ना?
आश्चर्य म्हणजे, या महाकाय प्रकल्पासाठी कुठला ‘हॉर्टिकल्चर कन्सल्टंट’ नेमला होता की प्रशासनाने स्वतःच्याच कल्पनाशक्तीने ही वनराई उभी करायचे ठरवले आहे? टेंडरमध्ये झाड किती उंचीचे असावे आणि त्याची जात कोणती, याचा साधा ‘पत्ता’ही नसावा? हे म्हणजे कसं झालं, “लग्नासाठी नवरदेव ठरला आहे, पण तो नक्की काय करतो आणि त्याचं वय काय, हे सर्वस्वी ‘लग्नाचं कंत्राट’ घेणाऱ्यानेच ठरवायचं!” उद्या कंत्राटदाराने आपल्या सोयीने ‘गवताची काडी’ लावून त्याला ‘वटवृक्ष’ म्हणवलं, तर पुणेकरांनी काय फक्त डोळे मिटून टाळ्या वाजवायच्या?
उज्ज्वल केसकर आणि त्यांच्या ‘त्रिमूर्ती’ मंडळींनी विचारलेले प्रश्न अगदी ‘झणझणीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या, पर्यायाने करदात्यांच्या पैशातून हे ‘नंदनवन’ फुलणार आहे. त्यामुळे यात ‘पारदर्शकता’ नावाचा आरसा हवाच. मेट्रोच्या बांधकामात ज्या बिचाऱ्या जुन्या वृक्षांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी ही झाडं लावली जातायत की केवळ सरकारी फायलींचे वजन वाढवण्यासाठी?
हर्डीकर साहेब, निर्णय नक्कीच पर्यावरणाला पोषक आहे, पण ती ४१ हजार झाडे केवळ कागदाच्या फाईलीत न वाढता पुण्याच्या जमिनीवर दिसावीत, इतकीच आमची माफक अपेक्षा. अन्यथा, “झाडे लावा, झाडे जगवा” ही घोषणा फक्त मेट्रोच्या स्टेशनवरच्या भिंतीवरच पाहायला मिळायची! आपण तातडीने या झाडांचा नकाशा जाहीर करावा, जेणेकरून पुण्याचा ‘ग्रीन कव्हर’ नेमका कुठे वाढणार आहे, हे पुणेकरांना उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. नाहीतर मग ‘खड्डा’ खणलाय कंत्राटदाराने आणि त्यात जातोय पुणेकरांचा पैसा, असं व्हायचं!


























