देहुरोड सामूहिक बलात्कार प्रकरण: चारही नराधमांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा


देहुरोड सामूहिक बलात्कार प्रकरण: चारही नराधमांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड : सन २०२१ मध्ये देहुरोड परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्या आणि तिला धमकावून वारंवार अत्याचार करणाऱ्या चारही आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून पीडितेला न्याय मिळाला आहे.

शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपी :

१) नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान २) सुल्तान ऊर्फ मुश्ताख सलीम सय्यद ३) रियाज ऊर्फ मन्नान जावेद खान ४) सोहेल शेरअली पिरझादे (सर्व राहणार देहुरोड, पुणे).

घटनेची पार्श्वभूमी : २०२१ मध्ये या चारही आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. इतक्यावरच न थांबता त्यांनी या कृत्याचे अश्लील चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केले. आरोपींनी पीडितेवर अनैसर्गिक कृत्य करून तिला मारहाण केली होती, तसेच तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

कायदेशीर कारवाई आणि तपास:

या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक २९३/२०२१ नुसार भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७६ (ड), ३७७, १२० (ब) सह माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकारी वकील अतिरिक्त सरकारी अभियुक्त पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद, वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी यामुळे आरोपींवरील दोष सिद्ध करण्यात यश आले.

न्यायालयाचे निरीक्षण:

पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर ओढलेले ताशेरे अत्यंत कडक आहेत. समाजात अशा प्रवृत्तींना स्थान नाही, हे स्पष्ट करत न्यायालयाने चौघांनाही दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पोलीस पथकाची कामगिरी:

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, विशाल गायकवाड आणि सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक डी. एस. शेळके, अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे आणि पोलीस शिपाई सचिन पतुरे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!