देहरंग धरणाचे ‘वाळवंट’ करायचा घाट ; प्रशासन झोपले की ‘अर्थ’पूर्ण मळे फुलवण्यात दंग..?


देहरंग धरणाचे ‘वाळवंट’ करायचा घाट ; प्रशासन झोपले की ‘अर्थ’पूर्ण मळे फुलवण्यात दंग..?

सुनील पाटील :

पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून सुरू असलेल्या बेकायदेशीर माती उत्खननामुळे धरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या या धरणातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर माती व गाळ उपसा करून तो विटा-भट्ट्यांच्या मालकांना विकला जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

**नियमांची पायमल्ली आणि नागरिकांना दमदाटी**

गेल्या अनेक दिवसांपासून धरणाच्या पात्रात जेसीबी, पोकलँड मशीन, डंपर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मातीचे उत्खनन सुरू आहे. आतापर्यंत हजारो ब्रास मातीचा साठा करून तो विक्रीसाठी ठेवल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. माती वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड धूळ निर्माण झाली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांना डंपर चालकांकडून “आमच्याकडे परवानगी आहे,” असे सांगत दमदाटी केली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

**तहसीलदारांकडून चौकशीचे आणि कारवाईचे आदेश**

या गंभीर विषयाची दखल घेत ‘ग्राम विकास संघर्ष समिती’चे गणपत वारगडा यांनी पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बेकायदेशीर माती उत्खननाचे पुरावे सादर करून सविस्तर चर्चा केली. या तक्रारीनंतर तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी संबंधित भागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्वरित घटनास्थळी जाऊन शहानिशा करण्याचे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाने आता घेतलेली ही दखल केवळ कागदावरच मर्यादित राहणार की प्रत्यक्षात कारवाई होऊन धरणाची लूट थांबणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

#PressMediaLive #PanvelNews #DeharangDam #IllegalMining #KonkanNews #MaharashtraNews #GramVikasSangharshSamiti #PublicSafety #EnvironmentalAlert


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!