निरोपाचा क्षण अन् विश्वासाचा दिवा ! पेठ वडगावच्या ‘कॉलेज ऑफ एज्युकेशन’चा आंतरवासिता सोहळा भावुक वातावरणात संपन्न


निरोपाचा क्षण अन् विश्वासाचा दिवा ! पेठ वडगावच्या ‘कॉलेज ऑफ एज्युकेशन’चा आंतरवासिता सोहळा भावुक वातावरणात संपन्न

पेठ वडगाव:

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ‘कॉलेज ऑफ एज्युकेशन’च्या भावी शिक्षकांच्या ‘आंतरवासिता टप्पा क्र. २’ची सांगता नुकतीच अत्यंत भावुक अन उत्साही वातावरणात पार पडली. निरोपाचा क्षण हा मुळातच जरा जड; पण श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा निरोप दुःख घेऊन नाही, तर विश्वासाचा एक हळुवार दिवा लावून आला. बुधवारच्या त्या प्रसन्न सकाळी दीपप्रज्वलन अन् रोपाला जलार्पण करून ज्ञानाच्या वेलीवर नव्या पालवीचा जन्म झाला.

छात्र मुख्याध्यापक अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविकातून या आंतरवासितेमागची अंतःस्थ भूमिका मांडली, तर प्रा. सोरटे एस. के. यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. गुरुजनांचा सत्कार होताना त्या आदराच्या भावनेत एक वेगळाच जिव्हाळा दाटून आला होता.

गेल्या काही दिवसांत छात्राध्यापकांनी शाळेतील लहानग्यांसाठी विविध स्पर्धांचे रंग भरले होते. गुणवंत बालकांना जेव्हा बक्षीस देऊन गौरवले गेले, तेव्हा त्या कोवळ्या चेहऱ्यांवरील आनंद आणि छात्राध्यापकांच्या डोळ्यांतील कौतुक पाहण्यासारखे होते. मुलांच्या अन प्रशिक्षणार्थींच्या मनोगतातून अनुभवांचे गाठोडे उलगडत गेले. मुख्याध्यापक डॉ. कोंडेकर एस. एच. यांनी भावी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचे अन् आपुलकीचे कौतुक करत त्यांना भविष्यातील आदर्शाचा वस्तुपाठ दिला. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आत्तार मॅडम, सुधिर माने सर आणि गायकवाड सर यांच्या उपस्थितीने प्रसंगाला कौटुंबिक उब मिळाली; त्यांनी दिलेल्या शुभेच्छा छात्राध्यापकांच्या पाठीवरची मायेची थाप ठरल्या.

‘दैनिक पुण्यनगरी’चे ब्युरो चीफ श्री. विजय मारुती पाटील यांनी आपल्या दिलखुलास वाणीने या सोहळ्यात प्राण फुंकला. “आजचा हा छात्राध्यापक उद्याच्या राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणारा खरा शिल्पकार आहे. केवळ पुस्तकाची पाने उलथणारा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर संस्कारांचे सोने उधळणारा शिक्षकच खरा जग जिंकतो,” हे त्यांचे शब्द उपस्थितांच्या थेट काळजाला भिडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्राचार्या डॉ. आर. एल. निर्मळे-चौगुले मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व छात्राध्यापकांचे अभिनंदन केले. “या आंतरवासितेच्या कुशीत तुम्ही घेतलेले धडे, हेच तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी आहे,” या त्यांच्या शब्दांनी भावी शिक्षकांच्या मनात कर्तव्याची नवी ज्योत पेटवली.

महाविद्यालयाच्या वतीने शाळेला प्रेमाची भेट देण्यात आली. प्रणिता कुंभार आणि शरणपाल सोनावणे यांनी रसाळ व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले, तर सीमा साबळे यांनी मानलेल्या आभाराने या स्नेहाची सांगता झाली. शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा माणुसकी आणि ज्ञानाची पेरणी करणाऱ्या एका नव्या प्रवासाची मंगल सुरुवात ठरला!


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!