हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून कृतिशील वाटचाल करणे हेच खरे अभिवादन – प्रसाद कुलकर्णी
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान स्मरणात ठेवून त्यांच्या विचारधारेनुसार कृतिशील वाटचाल करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. हीच हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र धर्म व मराठीकारणाची सामूहिक शपथही घेण्यात आली.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि विचारवंतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर ते संत गाडगेबाबा ही संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांची लोककल्याणकारी राजवट, तसेच महात्मा ज्योतिबा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या सर्व महापुरुषांनी मराठी मन आणि महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.
प्रारंभी उमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय चौगुले आणि गणेश भांबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, नगरसेवक शिवाजी पाटील, पैलवान उपमहाराष्ट्र केसरी अमृतमामा भोसले, इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजीत पटवा, मुख्याध्यापक संजय रेंदाळकर, राजू नदाफ, गणेश भांबे, नितीन ठिगळे, उदयसिंह निंबाळकर, राजुदादा आरगे, शितल मगदूम, विद्यासागर चराटे, महेंद्र जाधव,दीपक लाटणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजक उमेश पाटील यांनी आभार मानले.






























