छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची पोयंजे येथे सांगता; नागरिकांना शासकीय सेवांचा जागेवरच लाभ

सुनील पाटील
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ ची यशस्वी अंमलबजावणी अपर तहसील पनवेल यांच्या कार्यक्षेत्रात ७ मार्च ते ८ मे दरम्यान करण्यात आली. या अभियानांतर्गत एकूण पाच शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यातील पाचवे व अंतिम शिबिर आज दिनांक ०८/०५/२०२६ रोजी पोयंजे महसूल मंडळातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारवई येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात पनवेलचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. पवन चांडक साहेब, अपर तहसीलदार श्री. जितेंद्र इंगळे साहेब, निवासी नायब तहसीलदार श्री. संभाजी शेलार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींचेही प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या शिबिरात महसूल आणि भूमी अभिलेख विभागामार्फत विविध सेवांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ७/१२ मधील चुका दुरुस्त करणे, फेरफार निकाली काढणे, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, ८-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अकृषिक तरतुदी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पीएम किसान नोंदणी आणि तुकडेबंदी कायदा सुधारणांबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक श्रीम. वैशाली पाटील यांनी नैना प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या वेबसाईट आणि ऑनलाईन सुविधांची माहिती दिली. निवासी नायब तहसीलदार श्री. संभाजी शेलार यांनी महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात अनेक लाभार्थ्यांना जागीच दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या अभियानाचे विशेष आकर्षण भिंगार गावच्या महिला बचत गटांनी लावलेले घरगुती वस्तू व धान्याचे स्टॉल ठरले. तसेच भिंगारचे माजी सरपंच श्री. बाळाराम धर्मा फडके व त्यांच्या बालकलाकारांनी पारंपारिक वासुदेव नृत्यातून शासकीय योजनांची माहिती देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा गांधी मिशन (MGM) रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली यांच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी श्री. पवन चांडक यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी बारवईचे सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश बाबरे, माजी सरपंच नियती बाबरे, जगदीश मते, अशोक गायकर, जयश्री नाईक, विलास पाटील यांच्यासह पोयंजे मंडळातील सर्व सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आशा वर्कर आणि महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. संभाजी शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानून शिबिराची सांगता केली.



























