सावधान..! भाडेकरूची माहिती लपवाल तर थेट जेलची हवा खावी लागेल; देहुरोड पोलिसांचा घरमालकांना ‘फायनल’ इशारा


सावधान..! भाडेकरूची माहिती लपवाल तर थेट जेलची हवा खावी लागेल; देहुरोड पोलिसांचा घरमालकांना ‘फायनल’ इशारा

देहुरोड : चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड शहरात वाढत असलेली गुन्हेगारी आणि परप्रांतीयांचा वाढता वावर लक्षात घेता, देहुरोड पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलले आहे. कोणत्याही घरमालकाने किंवा दुकानदाराने आपल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना न देता त्याला आश्रय दिला आणि तिथे काही अनुचित प्रकार घडला, तर भाडेकरू इतकाच घरमालकही गुन्ह्यात भागीदार धरला जाईल, असा थेट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिला आहे.

देहुरोड पोलीस ठाण्यात आयोजित घरमालक-भाडेकरू समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना विक्रम बनसोडे म्हणाले की, केवळ पैशांच्या मोहापायी ओळख नसतानाही अनेकजण भाडेकरू ठेवतात. मात्र, अशा भाडेकरूंमुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. प्रत्येक घरमालकाने भाडेकरूचा ‘पोलीस पडताळणी’ (Police Verification) अहवाल जमा करणे अनिवार्य आहे. माहिती लपवल्यास संबंधित घरमालकावर भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच मालमत्तेचे वाद टाळण्यासाठी केवळ ११ महिन्यांचाच नोंदणीकृत करार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीत उपस्थित नेत्यांनी शहरातील ज्वलंत प्रश्न मांडले. श्रीमंत शिवशरण यांनी घरमालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली. तर हाजीमलंग मारीमुतू यांनी अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची कसून चौकशी करून गुंडांना तडीपार करण्याची मागणी केली. सूर्यकांत सुर्वे आणि भरत नायडू यांनी रेल्वे स्टेशन परिसर, वाईन शॉप आणि सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या टोळ्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे पोलिसांचे लक्ष वेधले. लहू शेलार यांनी नशायुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.

पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले की, जर तुमच्या शेजारी कोणी संशयास्पद व्यक्ती राहत असेल, तर त्याची माहिती पोलिसांना व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे द्या. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पात्रे यांनीही ऑनलाइन भाडेकराराचे महत्त्व पटवून दिले. आता देहुरोडमध्ये राहायचे असेल तर कायद्याचे पालन करावेच लागेल, अन्यथा पोलिसांचा बडगा अटळ आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!