पोरं शिकवायची की पोर्टल भरायचं.? : निवडणूक आणि ड्युट्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्ञानदात्याची मर्मभेदी व्यथा..!


पोरं शिकवायची की पोर्टल भरायचं.? : निवडणूक आणि ड्युट्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्ञानदात्याची मर्मभेदी व्यथा..!

आज महाराष्ट्राचा शिक्षक हा शिक्षक राहिला नसून, तो शासनाचा ‘मल्टिपर्पज गडी’ झाला आहे. ज्या हातांनी फळ्यावर उद्याच्या भारताचं भविष्य रेखाटायचं, ते हात आज मतदानाच्या याद्यांत नाव शोधण्यात आणि UDISE च्या पोर्टलवर ‘डाटा’ थुंकण्यात व्यस्त आहेत. काय अवस्था करून ठेवली आहे या ज्ञानदात्याची?

सकाळी शाळेत पाऊल ठेवल्या ठेवल्या, पोरांना ‘नमस्ते’ म्हणण्यापूर्वी मास्तराला मोबाईलवर ‘हजेरी’ नोंदवावी लागते. ती नोंदवताना सर्व्हर इतका हँग होतो की, मास्तरांच्या संयमाचा अंत होतो. पण सरकारला काय त्याचं? त्यांना हवी आहे फक्त ‘माहिती’! मग ती माहिती भरताना समोरच्या विद्यार्थ्याच्या डोक्यातील ‘ज्ञान’ रिकामं झालं तरी चालेल, पण पोर्टलचा रकाना भरलेला पाहिजे!

मास्तर की बैल? : सर्वांना पडलेला यक्षप्रश्न..!

शेतातला बैल तरी बरा असतो, त्याला निदान नांगरायचं कधी आणि थांबायचं कधी हे माहित असतं. पण सध्याच्या शिक्षकाची अवस्था त्याहूनही बिकट झाली आहे. त्याच्या मानेवर प्रशासनाने कामाचं असं काही ‘जू’ ठेवलंय की, त्याला ना धड वर्गात शिकवता येत, ना धड बाहेर आपली इज्जत वाचवता येते.

“मास्तर की बैल..?” हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चिला जात आहे. निवडणूक आली की मास्तर बीएलओ (BLO) होतो, पाऊस आला की मास्तर पिकांची पाहणी करतो, आणि जनगणना आली की मास्तर दारोदारी जाऊन माणसांची मोजणी करतो! अहो, एखाद्या वेळेस कामाच्या बैलाला विश्रांती मिळेल, पण मास्तराला या ‘अशैक्षणिक’ कामांतून सुटका नाही. याला ‘ज्ञानदान’ म्हणायचं की ‘सरकारी वेठबिगारी’?

निवडणूक आली की मास्तर ‘वनवास’ला..!

निवडणूक जाहीर झाली की, मास्तर हा शाळेचा राहतच नाही. उन्हातान्हात दारोदारी फिरा, मृतांची नावं काढा, नव्यांची नावं भरा. जणू काही या देशाची लोकसंख्या मोजण्याचं कंत्राट फक्त मास्तरांकडेच आहे! तिकडे वर्गात पोरं गुरुजींची वाट पाहत असतात आणि गुरुजी इकडे मतदारांचे ओळखपत्र अपडेट करत बसतात. हा कसला न्याय आणि हे कसले शैक्षणिक धोरण?

जनगणना असो, आधार अपडेट असो किंवा मग शाळेतल्या तांदळाच्या गोण्या मोजणं असो; शासन प्रत्येक कामासाठी मास्तराच्याच मानेवर ओझं ठेवतं. वरून “डिजिटल इंडिया”च्या गप्पा! अरे बाबांनो, मास्तर मोबाईलवरची लिंक ओपन करेपर्यंत वर्गातल्या पोरांच्या डोक्यातील लिंक कट झालेली असते, याचं भान कुणाला आहे का?

गुणवत्तेची अपेक्षा कुणाकडून?

एकडे तुम्ही मास्तरांच्या खांद्यावर जनगणनेचं ओझं टाकायचं, त्यांच्या गळ्यात मतदानाच्या ड्युट्या बांधायची, त्यांच्या हातात मोबाईल देऊन ‘दिवसभर माहिती पाठवा’ म्हणायचं आणि वर्षाच्या शेवटी ‘गुणवत्ता का घसरली?’ म्हणून त्यांनाच नोटीस पाठवायची! हा तर निव्वळ निर्लज्जपणा आहे.

“अहो, साहेब! मास्तराला फक्त मास्तर राहू द्या..!”

त्याला शिकवू द्या. त्याला पोरांच्या डोळ्यांतील कुतूहल वाचू द्या, पोर्टलवरचे आकडे नाही. जर उद्याची पिढी अडाणी राहिली, तर त्याला कारणीभूत मास्तर नसेल, तर मास्तराला ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ बनवणारे तुम्ही असाल!

आता तरी जागे व्हा! या ‘अशैक्षणिक’ कामांच्या मगरमिठीतून शिक्षकांना सोडा, नाहीतर महाराष्ट्राच्या शिक्षणाची ही ‘वारी’ विठ्ठलाच्या दर्शनाऐवजी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवण्यात आणि सर्व्हरच्या चकरा मारण्यातच संपून जाईल!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!