मँचेस्टरमध्ये विणलं जातंय भ्रष्टाचाराचं जाळं ; घोडके नगरच्या गटारात ‘पाणी’ की ‘पैसा’ मुरतोय?
इचलकरंजी म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर, पण सध्या या मँचेस्टरमध्ये कापडाऐवजी भ्रष्टाचाराचं जाळं विणण्याचं काम जोरात सुरू असल्याचं दिसतंय. प्रभाग क्रमांक १३ मधील घोडके नगर परिसरात सध्या जे काही ‘गटार पुराण’ सुरू आहे, ते पाहून साक्षात विश्वकर्मा सुद्धा कपाळावर हात मारून घेईल! हे बांधकाम आहे की मातीचा किल्ला, हेच सामान्यांना उमजेनासं झालंय.
या कामात सिमेंट शोधण्यासाठी आता दुर्बीण लावावी लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी जेव्हा या कामाचा ‘पाळणा’ हलवून पाहिला, तेव्हा त्यांना त्यात विकासाऐवजी विनाशाचीच लक्षणं जास्त दिसली. त्यांनी तातडीने आयुक्तांकडे धाव घेत तक्रार केली आणि मग कुठे प्रशासनाचे डोळे उघडले.
आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाचं कसबही न्यारंच आहे. एखादं काम निकृष्ट झालं की ते लगेच ‘नोटीस’ नावाचं अस्त्र बाहेर काढतात. जणू काही नोटीस बजावली की वाकडं झालेलं गटार आपोआप ताठ उभं राहणार आहे! प्रशासनाने आता संबंधित मक्तेदाराकडून ‘खुलासा’ मागवला आहे. हा खुलासा म्हणजे ‘चुकीला माफी नाही, पण देणाऱ्याला मरण नाही’ अशाच स्वरूपाचा असणार यात शंका नाही.
घोडके नगरमधील नागरिकांनी तर आता या कामाचा नादच सोडलाय. ज्या गतीने आणि ज्या ‘दर्जाचे’ साहित्य वापरून हे काम सुरू आहे, ते पाहता उद्या एखादा उंदीर जरी या गटारावरून धावला तरी तिथे भगदाड पडायचं! इचलकरंजीकर हे जरी विणकर असले, तरी भ्रष्टाचाराची कच्चे धागे त्यांना नीट ओळखता येतात. प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे नाचवू नयेत, अन्यथा हे ‘गटार’ गंगा थेट महापालिकेच्या दारात यायला वेळ लागणार नाही!



























