देहूरोड उड्डाणपुलाचा धबधबा बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन; रस्ते विकास महामंडळाला इशारा
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड: पावसाळ्यापूर्वी देहूरोड उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती व देखभाल करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा रस्ते विकास महामंडळाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास व शहर पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले असून, पुलाच्या निकृष्ट कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सुमारे ४३.२० कोटी रुपये खर्च करून १ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, पावसाळ्यात पुलावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी पीव्हीसी पाईप न लावल्याने साचलेले पाणी उंचावरून खाली पडते, ज्यामुळे या पुलाला दरवर्षी ‘धबधब्याचे’ स्वरूप येते.
या स्थितीमुळे खालील रहदारीच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर आणि नागरिकांवर उड्डाणपुलावरून घाण पाणी पडते. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “लोक वर्षाविहारासाठी लोणावळा-खंडाळ्याला जातात, पण देहूरोडच्या नागरिकांना या पुलाखालीच धबधब्याचा ‘अनुभव’ घ्यावा लागत आहे,” असा उपरोधिक टोला नागरिक लगावत आहेत. जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही अशी दुरवस्था असल्याने “४३ कोटी रुपये पाण्यात गेले का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील इतर उड्डाणपुलांचे काम उच्च दर्जाचे असून तिथे सुशोभीकरण आणि प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्या तुलनेत देहूरोड उड्डाणपुलाचे काम २०१९ मध्ये पूर्ण होऊनही सात वर्षांपासून येथील समस्या कायम आहेत. या पार्श्वभूमीवर, पुलाच्या दोन्ही बाजूंना पीव्हीसी पाईप बसवणे, रंगरंगोटी करणे, प्रकाश दिवे लावणे आणि पुलाखालील भागाचे काँक्रिटीकरण करणे अशा प्रमुख मागण्या मनसेने केल्या आहेत.
प्रशासनाने या पत्राची दखल घेऊन पुढील आठ दिवसांत कामाचे नियोजन स्पष्ट करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मावळ उपाध्यक्ष मोझेस दास, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, उपाध्यक्ष डॉमनिक दास, फ्रान्सिस थॉमस आणि महिला नेत्या मेरी थॉमस उपस्थित होते.


























