देहूरोड हादरले ! ‘सुंधा ज्वेलर्स’च्या मालकाचा ४० ग्राहकांना २६ लाखांचा चुना; ६५७ ग्रॅम सोने घेऊन बाप-लेक फरार


देहूरोड हादरले ! ‘सुंधा ज्वेलर्स’च्या मालकाचा ४० ग्राहकांना २६ लाखांचा चुना; ६५७ ग्रॅम सोने घेऊन बाप-लेक फरार

देहूरोड: प्रतिनिधी :

देहूरोड बाजारपेठेतील एका नामांकित सराफाने ग्राहकांच्या विश्वासाला तडा देत त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दागिने दुरुस्ती आणि नवीन दागिने घडवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ४० हून अधिक नागरिकांची फसवणूक करून दुकानदार बाप-लेक रात्रीतून फरार झाले आहेत.

नेमकी घटना काय? सुभाष चौक, मेन बाजार येथील ‘सुंधा ज्वेलर्स’ या दुकानात हा फसवणुकीचा मोठा डाव रचला गेला. १ जानेवारी २०२६ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी अंबालाल जिवाजी सोनी (वय ५६) आणि रोहित अंबालाल सोनी (वय ३०) यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने आणि रोख रक्कम स्वीकारली होती. मात्र, दागिने परत देण्याची वेळ आली असता, दुकानाला टाळे ठोकून आरोपींनी पोबारा केला.

लाखोंची रोकड आणि सोन्यावर डल्ला या फसवणुकीत एकूण २६ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. एका ४६ वर्षीय पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर हा घोटाळा समोर आला. अनेकांनी आपली वर्षानुवर्षांची पुंजी आणि दागिने विश्वासाने या सराफाकडे सोपवले होते, मात्र आता फसवणूक झाल्याने परिसरात संतापाची लाट आहे.

पोलीस कारवाई सुरू देहूरोड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक डोंगळे या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या फसवणुकीतील पीडितांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!