युद्धखोर वृत्तीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम : डॉ. श्रीराम पवार


युद्धखोर वृत्तीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम : डॉ. श्रीराम पवार

इचलकरंजी: प्रतिनिधी

“औद्योगिक क्रांतीची चाके इंधनावर चालतात आणि याच ऊर्जास्त्रोतांवर नियंत्रण मिळवणे हे भांडवलशाहीचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमेरिकेला युद्धखोरीतून पश्चिम आशियाची रचना बदलायची आहे, मात्र हवेतून बॉम्ब टाकून कोणतीही राजवट बदलता येत नाही, हा धडा या युद्धाने दिला आहे. आता हे युद्ध थांबले तरी त्याचे भीषण आर्थिक आणि सामाजिक परिणाम पुढील वर्षभर जगाला सोसावे लागतील,” असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.

समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित “अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाचे परिणाम” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.

युद्धाचे जागतिक परिणाम आणि अमेरिकेची भूमिका

डॉ. पवार पुढे म्हणाले की, “या युद्धामुळे जगाचा जीडीपी १ टक्क्याने घटण्याची शक्यता असून शेती, वस्त्रोद्योग, खते आणि निर्यातीवर याचे विपरीत परिणाम होतील. अमेरिकेने इराणच्या सर्वोच्च नेत्यांवर हल्ले करूनही त्यांना यश मिळालेले नाही, कारण इराणची व्यवस्था बळकट आहे. इराणचा भूगोल पाहता तिथे सैन्य उतरवून विजय मिळवणे अमेरिकेला अशक्य आहे. शेवटी वाटाघाटीतूनच मार्ग काढावा लागेल.”

भारताच्या भूमिकेवर भाष्य

भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना ते म्हणाले की, या युद्धात भारताने अमेरिका-इस्त्रायलकडे झुकलेली भूमिका घेणे हितावह नाही. मानवतावादी दृष्टिकोनातून निष्पाप मुलांवरील हल्ल्यांचा निषेध भारताने तातडीने करायला हवा होता. भारत या युद्धात मध्यस्थी करण्याच्या भूमिकेत दिसला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप

अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले की, अमेरिकेचा प्रयत्न इराणची संरक्षण यंत्रणा आणि उद्योग नष्ट करण्याचा आहे. हे युद्ध लवकर थांबले तरी त्याचे जागतिक अर्थकारणावरील संकट दीर्घकाळ राहील.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भारती पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. व्याख्यानानंतर डॉ. पवार यांनी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले. आभार प्रदर्शन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. या व्याख्यानास इचलकरंजी परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

आजचे व्याख्यान

विषय: डॉ. जयसिंगराव पवार यांची इतिहासदृष्टी

वक्ते: प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

वेळ: आज शनिवार, सायंकाळी ६ वाजता

स्थळ: समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!