इचलकरंजीत उद्घाटनाचा ‘पुनर्जन्म ‘; मुख्यमंत्र्यांच्या अब्रूची सत्ताधाऱ्यांकडूनच ‘होळी’!


इचलकरंजीत उद्घाटनाचा ‘पुनर्जन्म ‘; मुख्यमंत्र्यांच्या अब्रूची सत्ताधाऱ्यांकडूनच ‘होळी’!

इचलकरंजी | ज्या शहराने मँचेस्टरचा किताब मिरवला, त्याच इचलकरंजीत सध्या राजकारण्यांनी ‘धपाधपा’ उडालेल्या अब्रूचे तागे विणायला सुरुवात केली आहे. राजकारणात ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणणारे अनेक बहाद्दर आपण पाहिले, पण इचलकरंजीच्या विद्यमान आणि माजी आमदारांनी तर कहरच केला! खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या कामांच्या नारळावर आपले हात फिरवले होते, त्याच कामांचा आज पुन्हा ‘पुनरुद्धार’ करण्याचा अचाट पराक्रम इचलकरंजीच्या मंडळींनी करून दाखवला आहे. १५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी ज्या कामांचे ऑनलाईन थाटात उद्घाटन केले, त्याच कामांचे आज पुन्हा एकदा ‘उद्घाटन’ करून या महाशयांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला की स्वतःच्या बुद्धीचे दिवाळे काढले, असा तिखट सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.

हा उद्घाटन सोहळा की निव्वळ ‘फार्स ‘?

गंमत पहा, ५११ कोटींच्या विकासकामांचा ढोल मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच पिटला होता. त्यात ९.५ कोटींचे नाट्यगृह नूतनीकरण होते, १२ कोटींचा रिंग रोड होता आणि अण्णाभाऊ साठे कंपाउंडचे कामही होते. पण सत्तेची खुर्ची उबवणाऱ्यांना कदाचित मुख्यमंत्र्यांच्या हातापेक्षा स्वतःचे हात अधिक ‘पवित्र’ वाटले असावेत! निवडणुकांचे वारे वाहू लागताच लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी या जुन्याच कामांच्या पाटीला नवा रंग लावून पुन्हा एकदा रिबीन कापण्याचा सोहळा पार पडला. याला ‘विकास’ म्हणावे की लोकांची ‘दिशाभूल’, याचे उत्तर आता इचलकरंजीच्या जनतेनेच शोधायला हवे.

मतांचा जोगवा आणि नैतिकतेचा दुष्काळ

बावचकर यांनी आपल्या पत्रात सडकून टीका करताना म्हटले आहे की, “निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी ही धडपड सुरू आहे.” महापौरांना खुर्चीवर बसून दोन महिने उलटले, आचारसंहिता संपली, तरी ही कामे प्रत्यक्षात का सुरू झाली नाहीत? याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. सत्ताधारी मंडळींना नवे काही सांगता येत नाही, नवे काही करता येत नाही; मग आहे त्या जुन्याच कामांच्या उदघाटनाचा ‘फेरा’ घालायचा आणि आपण काहीतरी ‘दिवे’ लावत आहोत असे भासवायचे, हा निव्वळ राजकीय स्टंट आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर गदा !

मुळात, ज्या कामाचे उद्घाटन राज्याचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख करतो, त्याच कामाचे पुन्हा स्थानिक नेत्यांनी उद्घाटन करणे ही घटनात्मक आणि नैतिकदृष्ट्या निव्वळ बेअदबी आहे. सत्ताधारी मंडळींना ना मुख्यमंत्र्यांच्या शब्दाची किंमत राहिली आहे, ना जनतेच्या वेळेची! इचलकरंजीच्या जनतेने ज्या विश्वासाने या मंडळींच्या हातात सत्ता दिली, त्याचा उपयोग जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याऐवजी, ही मंडळी केवळ ‘प्रकाशझोतात’ राहण्यासाठी कॅमेऱ्यासमोर फुटकळ नारळ फोडण्यात धन्यता मानत आहेत.

थोडक्यात काय तर, जुनीच दारू नव्या बाटलीत भरून विकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणजे इचलकरंजीच्या राजकीय संस्कृतीचा ‘खेळखंडोबा’च म्हणावा लागेल!


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!