पिंपरी-चिंचवड पोलिसांची आंतरराष्ट्रीय सायबर टोळीवर मोठी कारवाई; म्यानमार-बँकॉक कनेक्शन उघड
पिंपरी: शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, तब्बल ६२ लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे थेट बँकॉक आणि म्यानमारमधील कुप्रसिद्ध सायबर कॉल सेंटर्सपर्यंत पोहोचले आहेत.
अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल
पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे:
१. सुशील भगवान जुवाटकर (वय ४२, रा. नेरुळ, नवी मुंबई)
२. पंकज राज कपूर (वय ३८, रा. जालंधर, पंजाब)
३. निश्चल टंकबीर बरेयली (वय २७, रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल)
जप्त साहित्य: ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस (POS) मशीन, २ लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, २ क्यु आर कोड स्कॅनर, १२ शिक्के, २४ बँक अकाऊंट ओपनिंग किट आणि ५ डेबिट कार्ड.
फसवणुकीची पद्धत
एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांचा गंडा घातला होता. यातील सव्वा लाख रुपये ‘अरशिल इंडस्ट्रिज प्रा. लि.’ या नवी मुंबईतील खात्यात जमा झाले होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी या खात्याचा शोध घेतला आणि तपासाचे चक्र फिरवले.
थेट म्यानमारशी कनेक्शन
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी पंकज कपूर आणि निश्चल बरेयली यांनी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमार येथील सायबर कॉल सेंटर्समध्ये काम केले आहे. तिथे भारतीयांना फसवण्याचे प्रशिक्षण आणि अनुभव घेतल्यावर, ते आता नवी मुंबईत स्वतःचे नवीन सायबर कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते. सुशील जुवाटकर याने त्यांना यासाठी मदत केली होती.
पोलीस पथकाची कामगिरी
ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, वनिता धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने आरोपींना बेड्या ठोकल्या. सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवून दिली.
पोलीस आवाहन: नागरिकांनी शेअर मार्केट किंवा कोणत्याही गुंतवणुकीच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी कॉल्स किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.




























