समोशाच्या चटणीत लोकशाही बुडवू नका; राघवा…

आजकालचे राजकारण म्हणजे कवी संमेलनापेक्षाही अजब झाले आहे. आजच्या राजकारण्यांचा बाह्य अवतार पाहिला तर वाटते जणू साक्षात हरिश्चंद्राचे अवतार, पण आतून मात्र सगळा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा बाजार! आमचे तरुण मित्र राघव चड्ढा यांनी नुकतेच संसदेत समोसा, चहा आणि मोबाईल रिचार्जवर जे काही ‘भाष्य’ केले, ते ऐकून आम्हाला एका बाजूला कौतुक वाटले, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या हतबलतेची कीव आली.
सामान्यांची नस पकडली, हे मान्यच !
हे खरं आहे की, आजवर कोणत्याही नेत्याने विमानतळावरच्या लूटमारीवर किंवा मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींवर इतक्या उघडपणे तोंड उघडले नव्हते. जीएसटी आणि टोलच्या नावाखाली सामान्य माणसाचे जे रक्त शोषले जात आहे, त्याबद्दल बोलण्याचे धाडस राघवांनी दाखवले, हे मान्यच करावे लागेल. आजच्या ‘डिजिटल इंडिया’त गरिबाचा फोन रिचार्ज करणे म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी करण्याइतके महाग झाले आहे. राघवांनी ही सर्वसामान्यांची नस नक्कीच पकडली आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.
… वरून कीर्तन आणि आतून तमाशा !
परंतु, आजच्या राजकारणाचे दुर्दैवी स्वरूपच असे झाले आहे की, ‘वरून एक आणि आतून भलतंच!’ समोर दिसायला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडल्याचा आव आणायचा, पण जेव्हा मुख्य शत्रूवर—म्हणजेच त्या हुकूमशाही प्रवृत्तीवर—थेट वार करायची वेळ येते, तेव्हा मात्र सोयीस्कररीत्या विषयांतर करायचे! मुकुंद किर्दतांसारखा सच्चा कार्यकर्ता जेव्हा तुम्हाला टोकतो, तेव्हा समजून जा की जनतेला आता नुसते ‘समोसा पुराण’ नकोय.
“ज्या हातांनी हुकूमशाहीच्या श्रीमुखात लगावायची होती, ते हात आता मोबाईल रिचार्जच्या पावतीवर रडगाणे गातायत. हा कसला क्रांतीचा आवेश आणि हा कसला आम आदमीचा प्रतिनिधी?”
धनुष्य उचला, राघवा !
जेव्हा ईडी आणि सीबीआयच्या पिंजऱ्यातून लोकशाहीचा गळा दाबला जात असतो, तेव्हा तुम्ही चहाच्या कपातील वादळात अडकून कसे चालेल? पंजाबचा शेतकरी एमएसपी साठी रस्त्यावर आहे, राज्याचा ८००० कोटींचा निधी केंद्र दाबून बसले आहे; हे प्रश्न चहा-समोशापेक्षा कित्येक पटीने मोठे आहेत.
राघवा, तुमची ही ‘जनतेची बाजू’ मांडण्याची पद्धत कौतुकास्पद असली, तरी ती केवळ ढाल म्हणून वापरू नका. मोदींच्या ‘ब्र’ ला ‘ब’ ने उत्तर देण्याची ताकद जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही, तोपर्यंत तुमचे हे राजकारण म्हणजे केवळ “वरून एक आणि आतून एक” असाच संशय निर्माण करेल.
समोसा महाग झालाय हे जगाला कळलेच आहे, आता हुकूमशाही देशाला कशी महाग पडतेय हे सांगायला संसदेत वाघासारखी डरकाळी फोडा. लोकशाही समोशाच्या चटणीत बुडवण्याइतकी स्वस्त नाही, हे ध्यानात ठेवा!






























