डीजेचा वापर नको, कायद्याचे पालन करा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करा: एसीपी बाळासाहेब कोपनर


डीजेचा वापर नको, कायद्याचे पालन करा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करा: एसीपी बाळासाहेब कोपनर

देहूरोड : येत्या १४ एप्रिल रोजी महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्याच्या उद्देशाने देहूरोड पोलीस ठाण्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ‘पिंपरी चिंचवड परिमंडळ २’ चे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बाळासाहेब कोपनर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, डीजेमुक्त आणि शिस्तबद्ध जयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

 

 

बैठकीच्या सुरुवातीला देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, जयंतीच्या मिरवणुकीत अनेकदा मद्यप्राशन करून डीजेसमोर होणाऱ्या गैरप्रकारांमुळे भांडण-तंटे निर्माण होतात. तसेच, ट्रॅक्टर किंवा रथावर लावलेल्या उंच साऊंड सिस्टीममुळे वर असलेल्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन अपघाताची भीती असते. त्यामुळे यंदा डीजेवर बंदी असून, उंचीची मर्यादा पाळणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

बैठकीत विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. संविधान सन्मान संघाचे अध्यक्ष रामदास ताटे यांनी सांगितले की, आम्ही डीजेऐवजी ढोल-ताशा, लेझीम, आरोग्य शिबीर आणि चष्मे वाटप असे उपक्रम राबवून डीजेमुक्त जयंती साजरी करणार आहोत. आरपीआयचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनीही डीजेमुळे होणाऱ्या अप्रिय घटनांचा उल्लेख करत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले, तसेच मिरवणुकीसाठी रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्याची विनंती केली. चिंचोली येथील राहुल गायकवाड यांनी मात्र आवाजाची मर्यादा राखून डीजेला परवानगी देण्याची मागणी केली. देहूगावच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत, गायन स्पर्धांसाठी रात्री १२:३० पर्यंत वेळ वाढवून देण्याची विनंती केली.

सर्व मान्यवरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसीपी बाळासाहेब कोपनर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आहे, त्यामुळे जयंती साजरी करताना संविधानाच्या मर्यादांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. डीजेच्या दणदणाटापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबवा. रक्तदान शिबिरे घ्या, गरीबांना अन्नदान करा, वह्या-पुस्तके वाटप करा. डॉ. बाबासाहेबांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला आहे, तो अमलात आणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत करा.

कोपनर यांनी पुढे बजावले की, १४ एप्रिल रोजी दारूची दुकाने पूर्णपणे बंद राहतील. मिरवणुकीत समोरासमोर येऊन वर्चस्व गाजवण्यापेक्षा ‘मी’ पणा सोडून नम्रपणे आणि आनंदाने उत्सव साजरा करा. डीजेच्या आवाजाची मर्यादा न पाळल्यास किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागतील. त्यामुळे अशा कारवायांची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना केले. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!