संपादकीय: डॉक्टर साहेब, तुमच्या स्टेथोस्कोपला माणुसकीची धडधड ऐकू येते की फक्त नोटांचा आवाज?


संपादकीय: डॉक्टर साहेब, तुमच्या स्टेथोस्कोपला माणुसकीची धडधड ऐकू येते की फक्त नोटांचा आवाज?

विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीचं लेणं मिरवणाऱ्या या पुण्यात आजकाल माणुसकीचं ‘स्मशान’ शांतपणे जागा धरू लागलं आहे की काय, असा थरकाप उडवणारा प्रश्न कोरेगाव पार्कच्या घटनेनं उभा केला आहे. श्वास कोंडलेला असताना, जगायच्या आशेने हॉस्पिटलच्या पायऱ्या चढणारा ३५ वर्षांचा तरुण प्रवीण म्हस्के आज मातीच्या ढिगाऱ्याखाली कायमचा निजला आहे. का? तर म्हणे तिथल्या डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला! अहो, डॉक्टर म्हणजे ‘धन्वंतरी’ असं आम्ही मानतो, पण जेव्हा हाच देव पांढऱ्या कोटातला ‘यमदूत’ बनून समोर उभा राहतो, तेव्हा या गरिबांनी जगायचं कोणाच्या भरवशावर?

महाराष्ट्र कोणत्या ग्रहाच्या कचाट्यात सापडला?

आजची परिस्थिती पाहिली की मनात विचार येतो, आमचा महाराष्ट्र नेमका कोणत्या वाईट ग्रहाच्या कचाट्यात सापडला आहे? हे आता एखाद्या ज्योतिषानेच सांगावं! राजकारण असो, समाजकारण असो की वैद्यकीय क्षेत्र; सगळीकडे जणू ‘शनीची साडेसाती’ सुरू आहे की काय, असं वाटू लागलंय. माणुसकीवर कोणत्या राहू-केतूचं सावट पडलंय, ज्यामुळे माणसाच्या रक्तापेक्षा पैशाला किंमत आली आहे? एकदा त्या ग्रहांची नावं कळली, तर किमान त्या वाईट ग्रहांची शांती तरी करता येईल आणि ही बिचारी जनता या त्रासातून मुक्त होईल! पण इथे तर ग्रह ताऱ्यांपेक्षा माणसांच्या मनातले ‘स्वार्थाचे ग्रह’ जास्त बलवान झाले आहेत.

विनाशाकडे चाललेली जगाची वाटचाल..

खरं तर, त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कोरोना काळापासूनच या जगातली माणुसकी संपत चालली आहे. जगाची ही वाटचाल आता विनाशाकडे चालली आहे की काय, अशी भीती वाटते. चांगलं होण्यासाठी जसं निमित्त लागतं, तसंच वाईट होण्यासाठीही आज ‘निमित्त’ शोधण्याची गरज उरली नाही. महाराष्ट्रातील जनता आज या व्यवस्थेला वैतागली आहे. सर्वसामान्यांच्या मनात एकच संताप उसळतोय – की आम्ही स्वतःचा जीव मुठीत धरून किती दिवस जगायचं?

कोडगे डॉक्टर आणि ससूनचा अहवाल !

कोरेगाव पार्कच्या त्या चकचकीत हॉस्पिटलमध्ये डॉ. नीलेश कोंद्रे आणि त्यांच्या चमूने नेमकी कसली शपथ घेतली होती? रुग्ण तडफडत असताना त्याचे प्राण वाचवणं हे तुमचं कर्तव्य होतं की त्याला मृत्यूच्या दारात ढकलणं? ससूनच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालाने तुमच्या कपाळावर ‘निष्काळजीपणाचा’ जो काळा टिळा लावला आहे, तो आता सात जन्मातही पुसता येणार नाही. उपचारांमध्ये झालेली कसूर ही केवळ ‘चूक’ नसते, तो एका कर्त्या पुरुषाचा केलेला ‘वैद्यकीय खून’ असतो!

कपाळावरचं कुंकू पुसलं, त्याचं काय?

प्रवीण म्हस्के, वय अवघं ३५! त्याच्या पत्नीनं, उर्मिला म्हस्के यांनी पोलीस ठाण्यात जी फिर्याद दिली आहे, ती वाचताना दगडालाही पाझर फुटेल. पण डॉक्टर, तुमचं काळीज दगडाचं झालंय की काय? श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून आलेला माणूस जर तुमच्या दारातून तिरडीवरून बाहेर पडत असेल, तर तुमच्या त्या पदव्यांना काय अर्थ उरतो? तुमच्या स्टेथोस्कोपला त्या मरणाऱ्या माणसाच्या काळजाची धडधड ऐकू आली नाही, पण किमान त्याच्या बायकोचा हंबरडा तरी ऐकू यायला हवा होता !

ज्या हातांनी रुग्णाला जीवदान द्यायचं, त्याच हातांनी जर त्याच्या मृत्यूच्या पत्रावर स्वाक्षरी होत असेल, तर धिक्कार असो अशा डॉक्टरकीचा! डॉक्टर साहेब, लक्षात ठेवा, गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाऊन बांधलेले तुमचे हे नफेखोरीचे इमले कधीच सुखाचे नसतात. महाराष्ट्राची ही वैतागलेली जनता आता शांत बसणार नाही. ज्या दिवशी तुमच्या पदवीपेक्षा तुम्हाला माणसाचा जीव मोठा वाटेल, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने ‘माणूस’ व्हाल. तोपर्यंत तुम्ही समाजाला लागलेली एक ‘वैद्यकीय कीड’ आहात!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!