जगात भारी ‘प्रेस मीडिया’ची स्वारी! पत्रकारितेनंतर आता चित्रपटसृष्टीत इतिहास घडवायला नवा अवतार !

इचलकरंजी | ज्यांच्या लेखणीने आजवर सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आणि ज्यांच्या सामाजिक कार्याचा डंका थेट ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तीनदा वाजला, त्या प्रेस मीडिया लाईव्ह या संस्थेने आता रूपेरी पडद्यावर स्वारी केली आहे! इचलकरंजीच्या ‘समाजवादी प्रबोधिनी’त ‘विखारातून विजयाकडे’ या लघुपटाचा मुहूर्त म्हणजे केवळ एका चित्रपटाचा प्रारंभ नसून, तो एका नव्या सामाजिक क्रांतीचा उदय आहे.


मांगुरे सरांचा चित्रपटसृष्टीचा तडका अन् ‘रप्पाटा’ टीमचे बळ !

मुहूर्त सोहळ्याला सकाळी ११ वाजल्यापासूनच इचलकरंजीकरांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते महमदरफिक मांगुरे सर यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रेस मीडिया लाईव्हच्या कार्याचा गौरव केला. मांगुरे सर केवळ कौतुक करून थांबले नाहीत, तर त्यांनी या युद्धात प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या लघुपटात ते प्रमुख भूमिकेत दिसणार असून, “प्रेस मीडियाच्या या पवित्र कार्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावीन,” अशी सिंहगर्जना त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे, या लघुपटासाठी ‘रप्पाटा’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभणार असून, त्यांच्या अनुभवामुळे या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त होणार आहे!

डॉ. श्वेता चौगुले यांचा रोकठोक इशारा!
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. श्वेता चौगुले यांनी व्यसनाधीनतेवर जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या, “नशा ही केवळ शरीराला नाही, तर अख्ख्या कुटुंबाला अन् पिढीला उद्ध्वस्त करणारी कीड आहे!” प्रेस मीडिया लाईव्हच्या या ‘नशामुक्त भारत’ अभियानाचे कौतुक करत त्यांनी “आम्ही सर्वजण एकत्र राहून हे काम तडीस नेऊ,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती आणि ‘खाकी’चा पाठिंबा !
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे आणि सहायक आयुक्त धनंजय पळसुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पोलीस प्रशासनानेही या सामाजिक उपक्रमाला आपले पूर्ण सहकार्य जाहीर केले. कार्यक्रमाचे नेटके स्वागत व प्रास्ताविक पत्रकार गजानन शिरगावे यांनी केले.

व्यासपीठावर मान्यवरांचा मेळा!
या ऐतिहासिक क्षणी व्यासपीठावर ‘रप्पाटा’ चित्रपटाचे निर्माते सुहास मगदूम, दिग्दर्शक प्रेमसागर सूर्यवंशी, ज्येष्ठ संपादक सखाराम जाधव, गणपती शिंदे, विकास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल बमन्नावर, शहाजी भोसले, बद्रेआलम देसाई, रवि वासुदेव, अनिस जमादार, ढवळे साहेब, श्रीहरी लोंढे आणि ज्येष्ठ कवी मोहिते मामा या सर्वांनी उपस्थित राहून या उपक्रमाला ‘लागतील ते सर्व सहकार्य’ करण्याचा शब्द दिला.
संपादकांचा कृतज्ञता भाव !
कार्यक्रमाच्या शेवटी, ज्यांच्या कल्पनेतून हा विश्वविक्रमी प्रवास सुरू झाला, ते प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “हे केवळ माझे काम नाही, तर आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.
अहो, जेव्हा एखादा निधड्या छातीचा संपादक, कसलेला नट आणि ‘रप्पाटा’ सारखी अनुभवी टीम एकत्र येते, तेव्हा परिवर्तनाचा नवा इतिहास लिहिला जातोच!” प्रेस मीडिया लाईव्हच्या या स्वारीने आता नशाखोरांचे धाबे दणाणले असतील हे नक्की!
डॉ. तुषार निखाळजे यांचे अभिनंदन..!
डॉ. तुषार निखाळजे यांनी शैक्षणिक विषयावर तीन भाषेत मराठी , हिंदी , इंग्लिश लिहिले असून त्याचे प्रकाशन प्रेस मीडिया ने केले आहे, त्यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्या देण्यात आल्या..




























