बळीराजाच्या घामावर ‘पांढरपेशा’ दरोडा ; म्हासुर्ली बँक अन् विकास संस्थेचा अजब कारभार!
कोल्हापूर : बळीराजाच्या घामाचा वास ज्यांना कळत नाही, अशा काही ‘सफेदपोश’ बहाद्दरांनी राधानगरीच्या गवशी गावात एक नवाच चमत्कार करून दाखवला आहे. एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे म्हासुर्ली बँक आणि खंडोबा विकास संस्थेच्या महाभागांनी संगनमताने एका सामान्य शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारला आहे. ही निव्वळ फसवणूक नसून, एका कष्टकऱ्याच्या आयुष्याशी खेळलेला हा भयंकर खेळ आहे.
गवशी येथील शेतकरी शहाजी संभाजी कांबळे यांच्या खात्यावर त्यांनी मागणी केलेली नसताना पैसे जमा करायचे आणि त्याच दिवशी कोणालाही न सांगता, कोणतीही स्वाक्षरी नसताना ते परस्पर काढून घ्यायचे, हा कोणता बँकिंग व्यवहार? हे तर सरळ सरळ ‘खिसेकापू’गिरीचे आधुनिक स्वरूप झाले! इतकेच नाही, तर त्यांच्या हक्काच्या ऊसाचे ४ लाख रुपये देखील या संस्थेने बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत. गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या या महाभागांना ना कायद्याची भीती उरली आहे, ना माणुसकीची चाड!
प्रशासनाचे डोळे पांढरे झाले आहेत की काय, असा प्रश्न पडावा इतकी दिरंगाई या प्रकरणात झाली आहे. पोलीस अधीक्षक आणि निबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. आता या अन्यायाविरोधात ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना’ मैदानात उतरली असून, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
आमची मागणी साधी आणि स्पष्ट आहे; म्हासुर्ली बँकेचे तत्कालीन मॅनेजर, संस्थेचे चेअरमन आणि दोषी संचालक मंडळावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. शेतकऱ्याचे ४ लाख रुपये व्याजासह परत मिळेपर्यंत आणि या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींना शासन होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. ज्या राज्यात शेतकऱ्याच्या घामाचे दाम परस्पर लाटले जातात, तिथला कायदा केवळ कागदावरच नाचतोय का, असा आमचा सवाल आहे.
६ एप्रिलच्या सकाळी १० वाजेपासून हे आंदोलन सुरू होईल. आता तरी प्रशासनाने आपली झोप झटकून जागे व्हावे, अन्यथा या आंदोलनादरम्यान काही अनुचित घडल्यास त्याचे सर्व खापर प्रशासनाच्या कपाळावर फुटल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आता स्पष्टपणे देण्यत आला आहे.




























