पालकांनो सावधान! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ १० इंग्रजी शाळा अनधिकृत; महापालिकेचा कडक इशारा
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी: आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मुलांचे प्रवेश घेणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील १० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना ‘अनधिकृत’ घोषित केले आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण अधिकारी संगीता बांगर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या संबंधित शाळांनी शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण केलेले नाहीत. तसेच आवश्यक मान्यता आणि तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करण्यातही या शाळा अपयशी ठरल्या आहेत. प्रशासनाने वारंवार नोटिसा देऊनही त्रुटी दूर न केल्यामुळे अखेर या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशा अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा देताना, शाळा सोडल्याचा दाखला (LC) मिळवताना आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना गंभीर कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
१ जूनपासून कारवाईचा बडगा
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १ जूनपासून या शाळांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली जाणार आहे. पालकांची फसवणूक टाळण्यासाठी या शाळांच्या प्रवेशद्वारासमोर “येथे प्रवेश घेऊ नये” असे स्पष्ट फलक महापालिकेच्या वतीने लावले जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी जाहिरातींना न भुलता शाळेच्या वैधतेची खातरजमा करणे आवश्यक आहे.
या आहेत अनधिकृत शाळा:
१) ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे
२) लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर
३) माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
४) डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
५) माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
६) नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
७) माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
८) हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
९) कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा
१०) गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी
दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली असून, अटी जाचक असल्याचा दावा केला आहे. मात्र, पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.



























