उन्हाने जीव व्याकुळ, धामणीचा मुक्काम चक्क अंथरुणात..!

नवेदानवाड: निसर्गाचा कोप झाला की पशू काय अन पक्षी काय, सगळ्यांचीच दैना होते. सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून घराघरांत उकाड्याने जीव नकोसा झाला आहे. अशातच गारवा शोधण्यासाठी निघालेली एक दहा फुटी ‘धामण’ चक्क नवेदानवाड येथील किरण अनिल कांबळे यांच्या घरात शिरली आणि थेट अंथरुणात जाऊन विसावली. रात्रीच्या वेळी हा प्रकार लक्षात येताच कांबळे कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला.
साप आणि तो ही चक्क अंथरुणात! हे दृश्य पाहून कुटुंबाची प्रचंड धावपळ उडाली. घरात भीतीचे वातावरण पसरले असतानाच दत्तवाडचे सर्पमित्र सोहेल गवंडी यांना तातडीने बोलावण्यात आले. एखाद्या निष्णात कलाकाराने आपली कला सादर करावी, तशाच शिताफीने आणि शांतपणे गवंडी यांनी त्या महाकाय धामणीला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता पकडले.
सापाला पकडल्यानंतर त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना सर्पमित्र सोहेल गवंडी म्हणाले की, रणरणत्या उन्हामुळे साप थंड जागा शोधत मानवी वस्तीकडे वळत आहेत. अशा वेळी घाबरून जाऊन सापाला मारण्याचे पाप करू नका, तर त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधा.
सोहेल गवंडी यांनी आजवर अनेक सापांना जीवदान देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या धाडसी कार्याचे कौतुक सध्या हेरवाड आणि दत्तवाड परिसरातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. एका बाजूला वाढते ऊन आणि दुसऱ्या बाजूला गारव्यासाठी सुरू असलेला हा निसर्गाचा संघर्ष आज या घटने निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



























