कोल्हापूर शिक्षण विभागातील प्रश्नांचा गुंता सुटणार ; उपसंचालक कोळेकर यांच्याकडून वार्षिक तपासणीची घोषणा


कोल्हापूर शिक्षण विभागातील प्रश्नांचा गुंता सुटणार ; उपसंचालक कोळेकर यांच्याकडून वार्षिक तपासणीची घोषणा

सांगली: अशोक मासाळ :

शिक्षण क्षेत्रातील रेंगाळलेले प्रश्न आणि शाळांच्या प्रशासकीय अडचणींना अखेर वाचा फुटली आहे. कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालिका मा. प्रभावती कोळेकर यांच्यासमोर शिक्षक नेत्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचा पाढा वाचला, आणि यातून शिक्षण विभागाच्या कारभाराला आता गती मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत.

गेल्या काही काळापासून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या आणि संचमान्यतेअभावी होणारे समायोजन यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. जे. एस. पाटील (आप्पा), आनंदराव पाटील (काका) आणि सुधाकर माने यांच्या शिष्टमंडळाने कोळेकर यांची भेट घेऊन या सर्व तांत्रिक अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना बी.एल.ओ. आणि इतर प्रशिक्षणांमुळे करावी लागणारी कसरत, हा कळीचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

उपसंचालिका कोळेकर यांनी या सर्व समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, विभागातील कामात एकसूत्रीपणा आणण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत विभागातील सर्व शाळांच्या वार्षिक तपासण्या पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शाळांचे प्रलंबित विषय मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

या भेटीत शंकरराव माळी, रतन कुंभार, शरद पाटील, तानाजी पवार आणि अशोक मासाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आता या आश्वासनानंतर शिक्षण क्षेत्रातील ही गाडी रुळावर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!