मुखात साखरेचा खडा अन् हाती यशाचा झेंडा! मुखेडच्या ज्ञानोबाचा नागपुरात ऐतिहासिक डंका!


मुखात साखरेचा खडा अन् हाती यशाचा झेंडा! मुखेडच्या ज्ञानोबाचा नागपुरात ऐतिहासिक डंका!

जैनोद्दीन पटेल :

अहो, याला म्हणतात मराठमोळा बाणा! ज्या भूमीच्या पाचवीलाच पुंजलेलं संकट आहे, जिथं ‘लेंडी प्रकल्पा’चा फास गळ्याभोवती असूनही इथली माणसं हार मानायला तयार नाहीत, तिथला एक तरुण नागपुरात जाऊन असा काही पराक्रम गाजवतो की साऱ्यांच्या नजरा विस्फारून जाव्यात! मुखेडच्या रावणगाव-भाटापूरच्या मातीतला हा ‘ज्ञानोबा’ नावाचा हिरा, आज विदर्भाच्या पेंच अभयारण्यात ज्ञानाचा असा काही प्रकाश पसरवतोय की नागपूरची थंडीही त्यानं उबदार झाली असेल!

सालेघाटचा पेंच अन् ज्ञानोबाचा वेध!

लातूरच्या अहमदपुरात ‘माऊली स्पर्धा परीक्षा केंद्रा’च्या माध्यमातून साडेतीनशे पोलीस आणि फौजी घडवणारा हा ज्ञानोबा शिवाजीराव पाटील नावाचा गडी साधासुधा नाही. अहो, लातूरच्या पोरांना ‘खाकी’ घालायला शिकवणारा हा पठ्ठा जेव्हा शिक्षक होऊन पेंच अभयारण्याच्या सालेघाट नावाच्या अतिदुर्गम भागात पोहोचला, तेव्हा तिथल्या डोंगर-दऱ्यांनीही विचारलं असेल, “पाटील, इथं काय करणार?” पण ज्ञानोबाने तिथं केवळ पाचवीचा वर्गच सुरू केला नाही, तर साक्षात इतिहास घडवला!

एकाचे दोन अन् दोनाचे दोनशे!

ज्या शाळेत पाचवीचा पत्ता नव्हता, तिथं ज्ञानोबाने वर्ग सुरू केला. विद्यार्थी किती? तर अवघे दोन! पण त्या दोन रत्नांपैकी आदर्श अंकुश शेवत्रे नावाच्या हिऱ्याला ज्ञानोबाने असं काही पैलू पाडले की, त्या पोराने चक्क ९६.२५ टक्के गुण मिळवून नागपूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला! हा केवळ एका विद्यार्थ्याचा विजय नाही, तर मुखेडच्या त्या जिद्दीचा विजय आहे जो पेंचच्या घनदाट जंगलातही शिक्षणाची मशाल पेटवतोय.

कौतुकाचा वर्षाव, मुखेडचा मान!

आज नागपूरच्या उपराजधानीत या मुखेडच्या सुपुत्राची ‘वा-वा’ होताना पाहून छाती अभिमानाने ३६ इंच नाही, तर ५६ इंच भरून येते! लेंडी प्रकल्पाच्या छायेत असलेल्या आपल्या गावाचं नाव या पोराने विदर्भाच्या नकाशावर कोरलंय. अधिकारी असोत वा गावकरी, प्रत्येक जण आज या ‘मास्तरा’ला सलाम ठोकतोय.

ज्ञानोबा, तुझा हा ‘आदर्श’ प्रवास असाच सुरू राहू दे. तुझ्या लेखणीतून आणि वाणीतून उद्याचे शेकडो ‘आदर्श’ घडोत, हीच सदिच्छा!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!