पुण्याचे ‘कोंढवा’ की खंडणीखोर पठाणांचा अड्डा ? महापालिकेच्या नावाखाली लुटालूट; शफी पठाण टोळीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’चा खेळ !

पुणे शहरात सध्या विद्येचा सुकाळ कमी आणि खंडणीचा सुकाळ जास्त झाला की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कोंढव्याच्या ‘पार्गे’ नगरात तर सध्या पठाणी कावा सुरू असून, शफी पठाण आणि त्याच्या टोळीने चक्क महापालिकेच्या कारवाईचा बागुलबुवा दाखवून बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचे सत्र सुरू केले आहे. हडपसरचे लेबर कॉन्ट्रॅक्टर अकबर मेहबूब खान यांना १५ लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न या टोळीच्या अंगलट आला असून, आता पोलीस आणि ‘मोक्का’ (MCOCA) काय करतो, याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहे.
तक्रारींचा ‘पंचक’ : ही तर खंडणीची सेंच्युरी..!
कोंढवा पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध तक्रारींचा जणू पाऊस पडत आहे. आतापर्यंत एकामागून एक पाच FIR दाखल झाल्या असून, यात भरडल्या गेलेल्या स्वाभिमानी नागरिकांनी आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे:
१. अब्दुल रहमान अहमद शेख : यांच्याकडून ५ लाखांची खंडणी उकळली.
२. मुस्तफा इमामसाहेब शेख : यांच्याकडे १५ लाख आणि चक्क एक २BHK फ्लॅटची मागणी केली.
३. आसिफ कदिर शेख : यांना तर ५१ लाखांचा गंडा घातला गेला.
४. देविदास राजाराम सोनटक्के : यांच्याकडे प्लॉट आणि ५ लाख रोख रकमेसाठी तगादा लावला.
५. अकबर मेहबूब खान : ताज्या तक्रारीनुसार, ७ मे २०२६ रोजी खान यांनी या टोळीविरुद्ध धाडसाने तक्रार नोंदवली आहे.
ही काही केवळ गुन्हेगारीची आकडेवारी नाही, तर या टोळीने मांडलेल्या उच्छादाचा पाढा आहे. घाम गाळायचा या कष्टकरी व्यावसायिकांनी आणि त्यावर डल्ला मारायचा या फुकटखाऊ खंडणीखोरांनी!
महापालिका : की खंडणीखोरांचे हत्यार ?
या टोळीची कार्यपद्धती मोठी गमतीशीर आणि तितकीच भयंकर आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचा ‘धाक’ दाखवायचा, तक्रारींची टपालं टाकायची आणि मग ‘सेटलमेंट’च्या नावाखाली लाखांचे आकडे फेकायचे. महापालिकेचे अधिकारी या रॅकेटमध्ये सामील आहेत की खंडणीखोर त्यांच्या नावाचा वापर करत आहेत, हे आता गुढ राहिले नसून SIT (विशेष तपास पथक) नेमून याचे वाभाडे काढण्याची वेळ आली आहे.
आता तरी ‘मोक्का’ लागणार का..?
शफी पठाण, समीर पठाण, साजिद शेख आणि कमल खैरनार या चौकडीने कोंढव्यात स्वतःची समांतर सत्ताच स्थापन केल्याचे चित्र आहे. एकाच टोळीवर पाच-पाच गंभीर गुन्हे दाखल होऊनही जर ही टोळी मोकाट फिरत असेल, तर पुणे पोलिसांच्या ‘कार्यक्षमतेवर’ कुणीही ओव्या गाणार नाही.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी:
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कोंढव्यातील या संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी SIT मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर MCOCA (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.



























