खालापूरच्या माती-चोरांची ‘माती’! चोरांच्या छाताडावर महसूलचा ‘जेसीबी’!

सुनील पाटील
जगात चोऱ्या अनेक प्रकारच्या होतात, पण खालापूरच्या माळरानावर सध्या ‘माती’ चोरणाऱ्या अवलींची एक नवीनच जमात अवतरली आहे. ही जमात इतकी निगर्वी की, यांना ‘आपली माती’ आणि ‘दुसऱ्याची माती’ यातला फरकच समजेनासा झाला होता. पण म्हणतात ना, “पाप कधी लपत नाही आणि सरकारी फाईल कधी सुटत नाही!”

खाणे-आंबिवली परिसरात एच.एस.सी.एल. कंपनीच्या जागेत काही महाभागांनी मातीचा सुळसुळाट मांडला होता. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात, चंद्राच्या साक्षीने ही मंडळी डंपर आणि जेसीबी घेऊन अशी काही माती उकरत होती की जणू तिथे सोन्याच्या विटाच गाडल्या आहेत! या माती-चोरांचे धाबे आता निवासी नायब तहसीलदार श्री. सुधाकर राठोड यांच्या एका कडक आदेशानं दणाणले आहेत.
मंडल अधिकारी श्रीनिवास खेडकर आणि तलाठी श्री. बलभीत लाटे यांनी जेव्हा पराडे कॉर्नरच्या सर्वे नंबर ४१/१ मध्ये धाड टाकली, तेव्हा चोरांची अवस्था ‘तोंडात बोळा आणि कपाळावर घाम’ अशी झाली. साहेबांनी विचारलं, “परवाना आहे का?” तसं डंपरवाल्यांच्या तोंडाचं पाणीच पळालं! परवाना तर नव्हताच, पण पळायला रस्ताही उरला नव्हता.
रसायनी पोलिसांनी या चोरांना आता भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कडक कलमाखाली असा काही ‘प्रसाद’ दिला आहे की, आता त्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढताना मातीची खरी किंमत कळेल. सुजित विठ्ठल माळी नावाच्या इसमासह तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल आता सरकारी ताब्यात आहे.
अहो माती-चोरांनो, सरकारी मालमत्तेवर हात मारताना जरा विचार करा. तुम्ही माती उकरली, पण साहेबांनी तुमचीच ‘माती’ केली! यापुढे जर रात्री-अपरात्री डंपर फिरवले, तर रसायनी पोलीस आणि तहसीलदार तुमची ‘वरदी’ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी ‘माती’ हेच सत्य आहे, पण ती अशी चोरून नेली की ‘तुरुंगाची माती’ खावी लागते, हे ध्यानात असू द्या!


























