काळजाचा ठोका चुकवणारा थरार ! ईश्वरपूरच्या उरुण भागात ६ तास बिबट्याचा धुमाकूळ; थरारक सुटका, झटापट अन् अखेर ड्रोनच्या मदतीने शिकार फत्ते..!

ईश्वरपूर | प्रतिनिधी
अहो आश्चर्यम्! ज्या ईश्वरपुरात माणसांच्या गर्दीने आणि राजकारणाच्या उखाड्या-पाखाड्यांनी कधी शांतता लाभत नाही, तिथे चक्क एका वनराजाच्या भाच्याने – म्हणजेच एका धष्टपुष्ट बिबट्याने – थेट नागरी वस्तीत ‘एन्ट्री’ मारली! उरुण परिसरातील महादेव मंदिराच्या साक्षीने तब्बल सहा तास जो काही थरार रंगला, त्याने ईश्वरपूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल!
सकाळी ९ वाजता कोरे यांच्या रेशन दुकानासमोरून हा ‘पाहुणा’ डुलत डुलत निघाला, तेव्हा लोकांना वाटले कोणीतरी पुढारी सकाळीच दौऱ्यावर निघाला की काय! पण जेव्हा त्याच्या अंगावरचे ठिपके आणि जबडा दिसला, तेव्हा मात्र साऱ्यांची पाचावर धारण बसली. तिथून त्याने थेट पाटील भजनी मंडळाकडे धाव घेतली. बहुधा शहरातील आरडाओरडा ऐकून त्यालाही देवाचे भजन करावेसे वाटले असावे! पण तिथल्या गोंधळाला कंटाळून या बिबट्याने माजी आमदार भगवानराव साळुंखे आणि दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या जुन्या घरामागील झाडीत आश्रय घेतला.
राजकारण्यांच्या घरात माणसांची गर्दी होणे नवे नाही, पण त्यांच्या दारात बिबट्या आल्यावर जी काही पळापळ झाली, त्यापुढे भल्याभल्यांच्या सभा फिक्या पडतील! शहरातील हौशा-नवशा आणि गवशांनी तर बिबट्या पाहायला अशी काही गर्दी केली होती, जणू काही निवडणुकीची जाहीर सभाच सुरू आहे! लोकवस्तीत बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस, वन विभाग घटनास्थळी धावले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास राजू पाटील यांच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये चारचाकी गाडीखाली दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे हणमंत पाटील, प्रथमेश पोळ आणि शिराळ्याचे सह्याद्री वॉरियर्सचे तरुण पुढे सरसावले. ‘कॅचिंग पोल’चा हिसका मिळताच बिबट्याने मोटारीवरून अशी काही गरुडझेप घेतली की, सगळ्यांची बोबडीच वळली! हणमंत आणि प्रथमेश यांनी प्राणांची बाजी लावून त्याच्यावर जाळे टाकले, बिबट्याशी थेट हातापायाची झटापट झाली. पण तो कसला सापडतोय? वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हाता-पायाला ओरबाडून बिबट्याने पुन्हा एकदा सुटका करून घेतली. हा थरार पाहून गर्दीतील अनेकांचे धोतर सुटायची वेळ आली होती!
बिबट्या आक्रमक झाला, तशी वनविभागाने आपली रणनीती बदलली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘ड्रोन’ कॅмера हवेत सोडण्यात आला. बिबट्याची अचूक जागा टिपली गेली आणि इमारतीभोवती जाळ्यांचे कुंपण उभारले गेले, ज्यामुळे कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. अखेर सांगली आणि कोल्हापूरवरून दोन लोखंडी पिंजरे आणि भुलीचे इंजेक्शन देणारी ‘गन’ मागवण्यात आली.
दोन तासांच्या शांततेनंतर, कोल्हापूरचे अमित कुंभार हे भुलीची गन घेऊन, डॉक्टरांच्या (डॉ. वाळवेकर, डॉ. वंजारी, डॉ. वाटेगावकर) मोबाईलवरील मार्गदर्शनानुसार पिंजऱ्यातून बिबट्याच्या समोर गेले. कुंभार यांनी अर्जुनसारखा अचूक निशाना साधला अन् ‘ठाऽऽय’… भुलीचे इंजेक्शन बिबट्याच्या अंगात शिरले. काही मिनिटांतच तो वनराज सुस्तावला आणि बेशुद्ध झाला. त्याला पिंजऱ्यात बंद करताच, गेल्या साडेपाच तासांपासून जीव मुठीत धरून बसलेल्या ईश्वरपूरकरांनी सुटकेचा मोठा निश्वास सोडला!
उरुण परिसराच्या इतिहासात बिबट्या येण्याची ही पहिलीच वेळ. पण या थरारातून एक गोष्ट स्पष्ट झाली – बिबट्या जंगली श्वापद असला तरी तो भुलीच्या इंजेक्शनने शांत होतो; पण बिबट्या आल्यावर तिथे जीव धोक्यात घालून सेल्फी काढायला धावणाऱ्या शहरातील ‘सुशिक्षित’ गर्दीला कोणती भूल द्यायची, हाच आता वन विभाग आणि पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे! वनविभागाच्या त्या बहाद्दर कर्मचाऱ्यांचे कौतुक करायला हवे, ज्यांनी स्वतः जखमी होऊनही ईश्वरपूरकरांचा जीव सुरक्षित ठेवला!
#IslampurNews #LeopardInTown #ForestDepartment #LeopardRescue #BreakingNews #MaharashtraNews #IslampurAlert #WildlifeRescue #DroneTechnology #PressMediaLive



























