पुणे महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पुणेकरांवर जलसमाधीची वेळ; फिरोज मुल्ला सरांचा ‘प्रेस मीडिया लाईव्ह’वरून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर थेट हल्ला.!

(विशेष प्रतिनिधी, पुणे)
खडकवासला धरणाचे दरवाजे अजून उघडलेले नाहीत, वरुणराजानेही अजून आपला ‘रुद्र’ अवतार दाखवलेला नाही; तरीही पुण्यातल्या मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्या पात्राबाहेर पडून सुसाट धावू लागल्या आहेत. बोपोडीच्या हॅरीस ब्रिजखाली मुळा नदीचे पाणी आज ज्या पद्धतीने अक्राळविक्राळ रूप धारण करून वाहत आहे, ते पाहून सामान्य पुणेकराच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. पण, प्रश्न असा आहे की, हा निसर्गाचा कोप आहे की पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागाच्या ‘पांढरपेशा निष्क्रियतेचा’ महापूर? नद्या तुडुंब भरल्यात याचं कौतुक करायचं, की प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कपाळमोक्ष करून घ्यायचा, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे प्रदेश मुख्य संघटक **फिरोज मुल्ला (सर)** यांनी याच गंभीर परिस्थितीवर बोट ठेवत प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे. मुल्ला सरांनी ऐन पावसाळ्यापूर्वी, म्हणजे काही महिन्यांपूर्वीच, पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागाच्या आयुक्तांची समक्ष भेट घेऊन, पुराव्यांसह लेखी पत्र दिले होते. एवढंच नव्हे, तर पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचे कानही टोचले होते. ‘नदीपात्रात पडलेला राडारोडा, कचरा आणि गाळ आधी काढा, नाहीतर पुणे बुडेल,’ असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला होता.
पण आमचे साहेब लोक! वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईलींवर सुशेगात सह्या करणाऱ्या या बाबू लोकांनी त्या इशाऱ्याची ‘गंभीर दखल’ घेण्याऐजवी ती फाईल बहुधा कचऱ्याच्या टोपलीत टाकली. परिणाम? आज अवघ्या काही दिवसांच्या पावसाने नद्यांची ही अवस्था झाली आहे. जर पहिल्याच पावसाने नद्या पात्राबाहेर जात असतील, तर नदीपात्रात साचलेला तो प्रचंड राडारोडा साफ करायला प्रशासनाचे हात कुणी बांधले होते? की तिथेही कोणत्या ‘टेंडर’चे मलाईदार राजकारण शिजत होते?
अजून तर पावसाळ्याचे चार महिने बाकी आहेत. खडकवासला धरण पूर्ण भरून जेव्हा त्याचे लाखो क्युसेक पाणी या नद्यांमध्ये सोडले जाईल, तेव्हा काय होईल? आज जो केवळ पावसाच्या पाण्याने पूरसदृश देखावा तयार झाला आहे, तो धरणाच्या पाण्यामुळे महापुरात बदलेल. लोकांच्या घरात पाणी शिरणार, गरिबांचे संसार वाहून जाणार आणि स्थानिक नागरिकांचे अतोनात नुकसान होणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
प्रशासनाच्या या ‘आंधळ्या आणि बहिऱ्या’ कारभारामुळे आज जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराचा फिरोज मुल्ला यांनी **प्रेस मीडिया लाईव्ह**च्या माध्यमातून तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या भीषण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार संदीप शेंडगे आणि पत्रकार प्रवीण चव्हाण यांनी चक्क स्वतः त्या वाढत चाललेल्या पाण्यात उभे राहून ग्राउंड रिपोर्टिंग केले आणि प्रशासनाच्या या डोळेझाकपणाचा बुरखा टराटरा फाडला. पत्रकार आणि जनतेचे प्रतिनिधी पाण्यात उतरून ओरडत आहेत, पण जबाबदार अधिकारी मात्र अजूनही आपल्या सुरक्षित कोरड्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, ही पुण्याची शोकांतिका आहे.

आता वेळ निघून गेलेली नाही, पण प्रशासनाच्या भरवशावर राहिलो तर पुणेकरांनो, जलसमाधी नक्की आहे! प्रशासनाला वेठीस धरून, त्यांच्या गचांडीला धरून पावसाळ्यापूर्वीची आणि चालू असलेली कामे करून घेण्यासाठी आता नागरिकांनी स्वतः पुढे आले पाहिजे. लोकशाहीत जनता जनार्दन असते, हे या सुस्त प्रशासनाला दाखवून देण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे. जागे व्हा, नाहीतर पुढचा पूर तुमच्या दारात असेल!



























