काय तो रस्ता… काय त्या भेगा… १२ कोटींच्या निधीचा कंत्राटदाराने केला ‘चक्काचूर’!


काय तो रस्ता… काय त्या भेगा… १२ कोटींच्या निधीचा कंत्राटदाराने केला ‘चक्काचूर’!

 

 

इचलकरंजी : अहो, काय ती इचलकरंजी! काय तो रस्ता! अन काय त्या रस्त्यावर पडलेल्या देखण्या भेगा! एखाद्या सुबक नक्षीकामासारखा हा रस्ता आता शहराच्या सौंदर्यात भर घालू लागलाय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गावभाग पोलीस स्टेशन आणि महासत्ता चौक ते आमराई रोड या मार्गावर सध्या ‘सिमेंट काँक्रीट’ नावाचा एक चमत्कार घडवला जातोय. सरकारचे तब्बल १२ कोटी रुपये खर्चून बनणारा हा रस्ता इतका ‘संवेदनशील’ निघाला की, लोकांची पावले पडायच्या आतच त्याला ‘उभ्या-आडव्या’ आठवणींच्या भेगा पडल्या आहेत!

कंत्राटदार महोदयांनी रस्ता बनवताना इतकी दूरदृष्टी ठेवली आहे की, पावसाळ्यापूर्वीच पाणी जमिनीत मुरावे म्हणून रस्त्याला स्वतःहूनच दरवाजे (भेगा) करून दिले असावेत, अशी मिश्कील चर्चा आता नागरिक करत आहेत. रस्त्याचा हा ‘उच्च दर्जा’ पाहून जनतेच्या मनात आनंदाऐवजी संशयाचा सुळसुळाट झाला आहे.

दाभोळेंचा ‘ई-मेल’ बाण..!

रस्त्याला पडलेल्या या ‘ऐतिहासिक’ भेगा पाहून भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांच्यातील ‘अत्रे’ जागे झाले नसते तरच नवल! त्यांनी थेट महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांच्या ईमेलवर एक खरमरीत ‘प्रेमपत्र’ (तक्रार निवेदन) धाडले आहे.

दाभोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बाबांनो, आधी या कामाची जरा तांत्रिक कुंडली तपासा. तोपर्यंत त्या बिचाऱ्या कंत्राटदाराला कोट्यवधींची बिले देऊन त्याचे हात बरबटू नका! काम जर निकृष्ट दर्जाचे निघालं (जे की उघड्या डोळ्यांना दिसतंच आहे), तर संबंधितांना कडक कारवाईचा ‘प्रसाद’ द्या.”

आता पालिकेचे कारभारी या ‘१२ कोटींच्या भेगा’ सिमेंट टाकून बुजवतात, की कंत्राटदाराला पाठीशी घालून स्वतःचे डोळे बुजवून घेतात, हे पाहणे रंजक ठरेल! तोपर्यंत इचलकरंजीकरांनी रस्त्यावरून चालताना ‘भेगा सांभाळून’ चालावे, हीच सदिच्छा!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!