४० लाखांचा दररोज ‘चुराडा’ आणि सॉफ्टवेअरचा ‘बोंबाबोंब’! श्रीकर परदेशींचा वारसा चालवणार की संस्था बुडवणार?
‘संस्था जगली तरच आपण जगू’; माजी लोकप्रतिनिधींचा प्रभारी सीएमडींना घरचा आहेर!
पुणे | ११ फेब्रुवारी २०२६ पुण्याची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी पीएमपीएल आज अक्षरशः ‘आयसीयू’मध्ये आहे की काय, अशी अवस्था झाली आहे. ४० ते ५० लाखांचा दररोज होणारा महसुली चुराडा, अकार्यक्षम सॉफ्टवेअर आणि वर्षानुवर्षे खुर्च्यांना डिंकासारखे चिकटलेले अधिकारी यांच्यामुळे ही संस्था रसातळाला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी प्रभारी सीएमडी पृथ्वीराज बी.पी. यांना पत्र लिहून प्रशासकीय अनास्थेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.
सॉफ्टवेअरचा ‘खेळ’ अन् प्रवाशांची ‘चोरी’!
आजच्या डिजिटल युगातही पीएमपीएलचं सॉफ्टवेअर ‘बैलगाडी’च्या वेगाने चालतंय की काय? प्रवाशाने तिकीट कुठे काढले, हे ट्रॅक करण्याची साधी सोय सॉफ्टवेअरमध्ये नाही. परिणामी, कंडक्टर प्रवाशापर्यंत पोहोचेपर्यंत प्रवासी एक स्टेज गाळून पुढच्या स्टेजचे तिकीट काढतो आणि प्रशासनाच्या तिजोरीला दिवसाला लाखो रुपयांचा चुना लावतो. जर हे सॉफ्टवेअर सुधारलं, तर दिवसाला ५० लाखांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो, पण हे करायला कुणाची ‘टक्केवारी’ आडवी येतेय, असा जळजळीत सवाल या पत्रातून विचारला गेला आहे.
श्रीकर परदेशींचा पॅटर्न विसरलात का..?
डॉ. श्रीकर परदेशी यांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात या संस्थेला नफ्यात आणून दाखवलं होतं. मग आजच्या आयएएस अधिकाऱ्यांना ते का जमू नये? एका बसमागे ११ कर्मचारी असूनही जर २३० बसेस डेपोत धूळ खात पडून राहत असतील, तर याला ‘नियोजन’ म्हणायचं की ‘धंदा’? कंत्राटदारांच्या बसेसवर महापालिकेचे कंडक्टर कशासाठी? हे सर्व थांबवून प्रशासकीय शस्त्रक्रिया करण्याची वेळ आता आली आहे.
खुर्चीला चिकटलेल्या ‘कासवां’ना बाहेर काढा..!
“ज्या अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून ‘साम्राज्य’ उभं केलंय, त्यांना आधी त्यांच्या मूळ जागी धाडा,” असा थेट इशारा या पत्रात दिला आहे. कामगार संघटनांशी दोन पावलं पुढे जाऊन चर्चा करण्याऐवजी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. जर सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली नाही, तर पुण्याचा ट्रॅफिक प्रश्न कधीच सुटणार नाही.
प्रभारी सीएमडी महोदय, आता ही संस्था वाचवण्यासाठी ‘धाडसी’ निर्णय घेणार की केवळ फाईलींवर सह्या करून वेळ मारून नेणार? पुणेकरांचे डोळे आपल्या निर्णयाकडे लागले आहेत!


























