कवलापुरात लोककलेचा जागर ; रयतच्या अंगणात संस्कृतीचा महोत्सव !

सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ
ज्या शिक्षणसंस्थेच्या पायाभरणीत कर्मवीरांचा घाम आणि रयतेचे प्रेम साचलेले आहे, त्याच रयत शिक्षण संस्थेच्या कवलापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात नुकताच एक आगळावेगळा ‘कलाविष्कार’ पार पडला. आजच्या ‘डिजिटल’ युगात आपली माती आणि आपली संस्कृती विसरू पाहणाऱ्या पिढीसमोर, रयतच्या या विद्यालयाने चक्क लोककलेचा जिवंत वारसाच उभा केला!

विनायक संकपाळ सर आणि मुख्याध्यापक एस.एस. पाटील सर यांच्या कल्पनेतून साकारलेला हा ‘कला उत्सव’ म्हणजे केवळ एक शालेय कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या अंगात खेळणाऱ्या लोकसंस्कृतीचा एक झंझावात होता!
गण-गौळणीचा गजर आणि वासुदेवाची स्वारी..!
कार्यक्रमाची रंगत इतकी अफाट होती की, जणू कवलापूरच्या मातीत महाराष्ट्राची लोककला अक्षरश: नाचू लागली. विठूनामाचा जयघोष करत आलेला वासुदेव, कपाळाला भंडारा लावून आलेले वाघ्या-मुरली, आणि ‘गड्या विडा रंगला ग’ म्हणत सादर झालेली लावणी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
नुसता नाच-गाणा नव्हे, तर समाजाला आरसा दाखवणारी विनोदी भारुडे, अंगावर शहारे आणणारा पोवाडा, आणि ज्याच्या तालावर अख्खा महाराष्ट्र थिरकतो तो धनगरी ढोल… अशा एक ना अनेक कलांनी हा उत्सव न्हाऊन निघाला होता. नंदीबैल, पोतराज आणि गोंधळ्यांच्या संबळाच्या आवाजाने विद्यालयाचे प्रांगण दुमदुमून गेले.
विद्यार्थ्यांच्या अदाकारीने जिंकली मने.!
केवळ बाहेरचे कलाकारच नव्हे, तर पाचवी ते अकरावीच्या चिमुरड्यांनीही ‘कंबर कसली’ होती. यात सर्वात जास्त टाळ्या मिळवल्या त्या ‘कटपुतली नृत्याने’. दोरीच्या तालावर हलणाऱ्या त्या बाहुल्यांनी जणू सजीव होऊन प्रेक्षकांशी संवाद साधला.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी गावकऱ्यांनीही तुफान गर्दी केली होती. जवाहर लिगाडे, प्रदीप पाटील, विद्या माळी, सुषमा पाटील यांच्यासह गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षणप्रेमींनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एका मोठ्या घरगुती समारंभाचे स्वरूप आले होते.
“ज्या मातीत ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांचा अभंग रुजला, त्याच मातीत आज धनगरी ढोलाचा कडकडाट आणि वासुदेवाची पावा घुमली! निमित्त होते, कवलापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालयातील ‘कला उत्सवाचे’. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या काळात आपल्या अस्सल मराठमोळ्या लोककलेचा असा नयनरम्य जागर मांडल्याबद्दल या विद्यालयाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे…”


























