अखेर सस्पेन्स संपला..! इचलकरंजी काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे भाजपमध्ये जाणार नाहीत


अखेर सस्पेन्स संपला..! इचलकरंजी काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे भाजपमध्ये जाणार नाहीत

 

इचलकरंजी: महानगरपालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आपण काँग्रेसशीच एकनिष्ठ असून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करत कांबळे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आघाडीत उडाली होती खळबळ

संजय कांबळे हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि अत्यंत सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते भाजपच्या वाटेवर असून त्यांच्यासोबत इतरही काही पदाधिकारी पक्षांतर करणार असल्याच्या बातम्यांमुळे शिव-शाहू विकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात होता.

पक्षांतराचा दावा फेटाळला

या संदर्भात संजय कांबळे यांच्याशी थेट संपर्क साधला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे. पक्ष सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आगामी महानगरपालिका निवडणूक मी शिव-शाहू विकास आघाडी मधूनच पूर्ण ताकदीने लढणार आहे.”

चर्चांवर पडदा

कांबळे यांच्या या स्पष्ट खुलाशामुळे गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या राजकीय तर्क-वितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आघाडीने निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!