बातमीसाठी ‘साहेब’, आणि जाहिरातीसाठी मात्र ‘गायब’?


बातमीसाठी ‘साहेब’, आणि जाहिरातीसाठी मात्र ‘गायब’?

पत्रकारिता ही कुणाची खासगी मालमत्ता नाही..!

आजचे वास्तव : बातमी लावेपर्यंत ‘साहेब-दादा’ आणि जाहिरात मागितली की ‘काम थंड आहे’ चा पाढा..!

सध्याच्या काळात पत्रकारिता करणे म्हणजे ‘लोकांच्या सुख-दु:खात सामील होणे’ कमी आणि ‘लोकांच्या प्रसिद्धीची हौस भागवणे’ जास्त झाले आहे. राजकीय नेते असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा विविध संघटनांचे पदाधिकारी; यांना बातमी लावण्यासाठी पत्रकारांची आठवण अगदी हक्काने येते. पण हीच ‘हक्काची’ माणसे जाहिरातीच्या वेळी मात्र ‘परकी’ का होतात? हा आता कळीचा प्रश्न बनला आहे.

१. व्हाट्सअपवरील तो ‘अधिकार’

सकाळपासून मोबाईलवर मेसेजचा खच पडतो— “साहेब, बातमी पाठवली आहे, तेवढी लावून द्या”, “ग्रुपवर बातमीची लिंक टाका”, “फोटो चांगला वापरा”. ही विनंती वजा आज्ञा पाळून पत्रकार आपली बातमी प्रसिद्ध करतो. पण ही बातमी प्रसिद्ध करण्यासाठी लागणारं इंटरनेट, वीज, आणि अहोरात्र कष्ट याची जाणीव बातमी देणाऱ्याला कधी होणार..?

२. जाहिरातीचा विषय निघाला की ‘बजेट’ संपते!

जेव्हा तोच पत्रकार आपल्या पोटापाण्यासाठी किंवा संस्थेच्या खर्चासाठी एखाद्या छोट्याशा जाहिरातीची मागणी करतो, तेव्हा समोरून येणारी उत्तरं थक्क करणारी असतात:

सध्या मार्केट डाऊन आहे.”

“आमच्याकडे प्रसिद्धीसाठी बजेटच नसतं.”

“पुढच्या वेळी नक्की बघू, आता फक्त बातमी द्या.”

आश्चर्य वाटते जेव्हा हेच लोक वैयक्तिक वाढदिवसाच्या फ्लेक्सवर, रॅलीवर आणि इव्हेंटवर लाखो रुपये खर्च करतात; मग माध्यमांना द्यायला त्यांच्याकडे पैसे का नसतात?

३. माध्यमं म्हणजे ‘फुकटचे पीआर’ नाहीत!

अनेकांना असे वाटते की बातमी लावणं म्हणजे फक्त कॉपी-पेस्ट करणं आहे. पण त्या एका बातमीच्या मागे पत्रकाराची विश्वासार्हता आणि माध्यमाचा डोलारा असतो. जर प्रत्येकाला ‘फुकटची प्रसिद्धी’ हवी असेल, तर मग पत्रकारांनी आपले प्रपंच कसे चालवायचे? हा व्यवसाय की समाजसेवा? जर समाजसेवा असेल, तर ती फक्त पत्रकारानेच का करावी?

४. आमचा इशारा…

पत्रकारिता ही कोणाच्या बापाची किंवा खासगी मालमत्ता नाही की जेव्हा वाटेल तेव्हा वापर करून घ्यावा. जे सन्मान देतात आणि माध्यमांच्या अस्तित्वाची काळजी घेतात, त्यांच्याच बातम्यांना आता प्राधान्य मिळेल. केवळ ‘वापरा आणि फेकून द्या’ ही वृत्ती आता खपवून घेतली जाणार नाही.

राजकीय नेत्यांचा दुटप्पीपणा : जाहिरात मागितली की ‘पॅकेज’ची चर्चा?

काही राजकीय नेते आणि पुढारी पत्रकारांवर असा आरोप करतात की, “बातमी लावायला सांगितली की पत्रकार जाहिरात किंवा पॅकेज मागतात.” पण या नेत्यांना आमचा एक रोखठोक सवाल आहे— तुम्ही तरी राजकारणात सगळं ‘फुकट’ करता का?

निवडणुकीच्या वेळी तुम्ही जे कोट्यवधी रुपये खर्च करता, ते ‘समाजसेवा’ म्हणून करता की सत्तेच्या ‘पॅकेज’साठी?

शासकीय कंत्राटं असोत, बदल्यांचे व्यवहार असोत वा विकासकामांचे कमिशन; तिथे तुमचे ‘पॅकेज’ ठरलेले नसते का? जनतेच्या कामासाठी ‘निधी’ मागताना तुम्हाला संकोच वाटत नाही, मग पत्रकाराने त्याच्या हक्काची ‘जाहिरात’ मागितली की तुम्हाला तो व्यवहार का वाटतो राजकारण्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, तुम्ही जसे राजकारण पूर्णवेळ करता, तसाच पत्रकारही आपला प्रपंच या व्यवसायावर चालवतो. जर तुम्हाला राजकारणात फुकटचे काही खपत नाही, तर पत्रकाराने तरी तुमची ‘फुकटची प्रसिद्धी’ का करावी?

ही तर तुमच्याच अस्तित्वाची लढाई..!

पत्रकार जेव्हा जाहिरात मागतो, तेव्हा तो त्याच्या संस्थेला आणि पर्यायाने तुमच्या आवाजाला जिवंत ठेवण्यासाठी इंधन मागत असतो. स्वतःच्या प्रचारासाठी सोशल मीडिया सांभाळणाऱ्या पोरांना पगार देता, डिजिटल मार्केटिंगला पैसे मोजता; पण खऱ्या पत्रकाराला मात्र ‘पॅकेज’च्या नावाखाली बदनाम करता? हा दुटप्पीपणा आता थांबायला हवा.

थोडक्यात सांगायचे तर: जाहिरात मागणे हा आमचा अधिकार आहे, कारण आम्ही तुमची बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कष्ट घेतो. जर राजकारण ‘धंदा’ होऊ शकतं, तर पत्रकारितेला किमान ‘सन्मानाने जगण्याचा आधार’ तरी मिळावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.

 

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!