लेंडी धरणग्रस्तांचा एल्गार! जैनोदीन पटेलांच्या नेतृत्वात मुक्रमाबाद मध्ये पेटली संघर्षाची ठिणगी


लेंडी धरणग्रस्तांचा एल्गार! जैनोदीन पटेलांच्या नेतृत्वात मुक्रमाबाद मध्ये पेटली संघर्षाची ठिणगी

मुक्रमाबाद (प्रतिनिधी): लेंडी धरण प्रकल्पासाठी जमिनी देऊन अनेक वर्षे उलटली, तरीही धरणग्रस्तांच्या पदरात अद्याप केवळ आश्वासनेच पडली आहेत. प्रशासनाच्या या उदासीनतेविरुद्ध आता धरणग्रस्तांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लेंडी धरणग्रस्त संघर्ष योद्धा’ जैनोदीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुक्रमाबाद येथे पार पडलेल्या धरणग्रस्तांच्या बैठकीत संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात आले.

प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र संताप

या बैठकीत धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जमिनीचा योग्य मोबदला, पुनर्वसनाचा प्रश्न आणि नोकरी संदर्भातील आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. “आमच्या त्यागाची किंमत प्रशासन कधी देणार?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. जैनोदीन पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आता विनंत्यांचे दिवस संपले आहेत, हक्क मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल.”

शेतकरी संघटना आणि मान्यवरांचा पाठिंबा

या लढ्याला बळ देण्यासाठी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला. तसेच माधवराव देशमुख आणि माजी उपसरपंच चांदसाब कुरैशी यांनीही प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. या बैठकीला गावातील जबाबदार नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

यांची होती प्रमुख उपस्थिती:

बैठकीला शफी कुरैशी, युनूस मौलीसाब, खाजाभाई चौधरी, उमाकांत सुनेवाड, बाबुराव बोयवार, रामराव कांबळे, माधव बोयवार, तानाजी बोयवार, माधव गडलावार, शिवाजी तोकलवाड यांच्यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक, महिला आणि तरुण वर्ग उपस्थित होता.

पुढील दिशा:

या बैठकीनंतर धरणग्रस्तांनी एकजुटीने सरकारला इशारा दिला आहे की, जर लवकरच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मोठे जनआंदोलन छेडले जाईल. महिला आणि तरुणांच्या मोठ्या सहभागामुळे या आंदोलनाला आता विशेष धार चढली असून, मुक्रमाबाद परिसरात धरणग्रस्तांचा हा आवाज चांगलाच घुमू लागला आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!