दहा मिनिटांचा ‘कसाई’ आणि एका कोमल कळीचा अंत!


नियम की नरबळी..?

दहा मिनिटांच्या उशिरासाठी एका ‘कोमल’ कळीचा गळा घोटणारी ही शिक्षणव्यवस्था नव्हे, तर साक्षात कसाईखाना आहे!

मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार :

काय म्हणावं या नीच आणि पाषाणहृदयी व्यवस्थेला? काल पाटण्याच्या त्या ‘महाराजचक’ गावात एका उमलत्या कळीचा अंत झाला. कोमल नावाची ती पोरगी, जिच्या डोळ्यात गरिबीतून वर येण्याची स्वप्नं होती, जिच्या बापाने मजुरी करून तिला शिकवलं होतं, ती पोरगी आज मातीत मिसळली! का? तर म्हणे तिला परीक्षेला पोहचायला दहा मिनिटं उशीर झाला!

अरे, तुमच्या त्या लोखंडी फाटकाला माणुसकीची चाड नव्हती की त्या फाटकामागे बसलेल्या अधिकाऱ्यांच्या छातीत काळजाऐवजी धोंडा होता?

दहा मिनिटांची किंमत मृत्यू?

नऊ वाजता गेट बंद झालं आणि ती नऊ वाजून दहा मिनिटांनी तिथे पोहोचली. ती पोरगी ओरडत होती, “साहेब, माझं करिअर बरबाद होईल, गेट उघडा!” साडेनऊला पेपर सुरू होणार होता, हातात वीस मिनिटं शिल्लक होती. पण नाही! तिथे ‘नियम’ नावाचा राक्षस बसला होता. नियमांच्या त्या रद्दी पुस्तकात माणुसकीसाठी एक ओळही नसावी?

मला सांगा, तुमच्या मंत्र्यांच्या गाड्यांसाठी जेव्हा रस्ते तासभर रोखले जातात, तेव्हा तुमचे नियम कुठे जातात? जेव्हा बड्या बापाची पोरं उशिरा येतात, तेव्हा तुमचे कायदे कुठे शेण खायला जातात? पण ही एका गरिबाची पोर होती, एका मजुराची लेक होती, म्हणून तिला कुत्र्यासारखं बाहेर उभं केलं!

हा अपघात नव्हे, हा सरकारी खून आहे!

ती निरागस पोरगी तिथेच कोसळली. ती मेली नाही, तिला तुम्ही मरायला भाग पाडलंत. रेल्वेच्या डब्यातून जेव्हा तिने खाली उडी मारली असेल, तेव्हा तिच्या मनात काय विचार आले असतील? “माझं वर्ष गेलं, माझ्या बापाचे कष्ट मातीला मिळाले, आता मी जगाला काय तोंड दाखवू?” या विवंचनेतून तिने मृत्यूला कवटाळलं.

अरे, शिक्षण हे माणसाला जगवण्यासाठी असतं की मरण्यासाठी? ज्या शिक्षणव्यवस्थेत एखाद्या विद्यार्थ्याच्या प्राणापेक्षा ‘दहा मिनिटांचा उशीर’ मोठा ठरतो, त्या व्यवस्थेला आग लावून दिली पाहिजे!

माजलेल्या व्यवस्थेला माझा सडेतोड सवाल!

आज मला त्या परीक्षा केंद्रावरच्या ‘कर्तव्यदक्ष’ (?) महोदयांना विचारायचं आहे— उद्या जर तुमच्या घरातल्या पोरीसोबत असं घडलं असतं, तर तुम्ही तिला असंच वाऱ्यावर सोडलं असतं का? की तिथे तुमचे नियम वाकले असते?

मंटू यादव या मजुराची लेक कोमल आज या जगात नाही. तिने रेल्वेतून उडी मारली नाही, तर तुमच्या या सडलेल्या व्यवस्थेने तिला धक्का दिला आहे! हा अपघात नाही, हा ‘सिस्टम’ने केलेला थंड रक्ताने खून आहे!

हे ‘डिजिटल इंडिया’चे कसले गोडवे गाताय? जिथे दहा मिनिटांसाठी एका विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते, तिथे तुमची प्रगती म्हणजे स्मशानातलं चांदणं आहे! धिक्कार असो अशा नियमांचा आणि धिक्कार असो त्या नियमांच्या नावाखाली माणुसकीचा गळा घोटणाऱ्यांचा!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!