प्रसाद कुलकर्णी यांनी किर्लोस्करवाडीत सरकारी धोरणांचे वाभाडे काढले.
ओ
किर्लोस्करवाडी | प्रतिनिधी
“ज्या देशात १४० कोटींपैकी ८० कोटी जनतेला पाच किलो मोफत धान्यासाठी रांगेत उभे राहावे लागते, तो देश प्रगत म्हणायचा की परावलंबी? हा राष्ट्राचा अभिमान नसून राज्यकर्त्यांच्या फसव्या धोरणांची जाहीर कबुली आहे,” अशा तिखट शब्दांत ज्येष्ठ विचारवंत प्रसाद माधव कुलकर्णी यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढवला.
रामानीनगर (किर्लोस्करवाडी) येथील ‘आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेच्या’ सांगता सत्रात ते बोलत होते. ‘कष्टकऱ्यांच्या समस्या आणि सरकारचे धोरण’ या विषयावर कुलकर्णी यांनी मांडणी करताना सरकारचा ‘कार्पोरेट’ चेहरा उघडा पाडला.
जॉबलेस ते जॉबलॉस: विकासाचे नाव घेऊन लोकांच्या हातातील काम हिरावून घेण्याचे पाप हे सरकार करत आहे.
श्रमाची चोरी: खाजगीकरणाच्या नावाखाली वीज, बँका आणि विमा क्षेत्र भांडवलदारांच्या घशात घातले जात असून कष्टकऱ्यांचे शोषण वाढले आहे.
माणूस की नफा?: धोरणे ही ‘मनुष्यकेंद्रित’ असायला हवीत, पण ती आज केवळ ‘नफाकेंद्री’ झाली आहेत.
“माणसाला फुकटच्या अन्नापेक्षा स्वतःच्या हाताला आणि मेंदूला मिळणारे काम सन्मानाचे वाटते. पण सरकारला सन्मानापेक्षा लाचार जनताच अधिक प्रिय दिसतेय की काय?” असा जळजळीत सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी व्यासपीठावर व्ही.वाय. पाटील, किरणतात्या लाड, आदम पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच दत्तात्रय मानुगडे यांच्या ‘दोन भाकरी’ आणि ‘खोकल्याची बाटली’ या कथासंग्रहांचे प्रकाशन करून कष्टकऱ्यांच्या व्यथांना साहित्यातूनही वाट करून देण्यात आली.
Views: 106


























