इचलकरंजीच्या ‘विठ्ठलनगर’मध्ये नरकयातना ; महानगरपालिकेच्या थोबाडावर महिलांचे ‘रस्ता रोको’ अस्त्र !
इचलकरंजी | गजानन शिरगावे :
ज्या इचलकरंजीला आपण ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून मिरवतो, त्या शहराच्या अब्रूची लक्तरे आज विठ्ठलनगरच्या सांडपाण्यात तरंगताना दिसली! गेली कित्येक दिवस विठ्ठलनगरमधील जनता नरकयातना भोगत आहे. घराच्या दारापर्यंत गटारगंगा आली, तरी महानगरपालिकेचे ‘कुंभकर्णी’ प्रशासन ढाराढूर झोपले होते. अखेर, या प्रशासनाच्या थोबाडावर सणसणीत चपराक लगावण्याचे काम इथल्या रणरागिणींनी केले आहे!
प्रशासनाचा ‘बेशरम’पणा आणि जनतेचा संताप!
विठ्ठलनगर परिसरात गटारी तुंबून सांडपाणी थेट लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहे. परिसरात सुटलेली दुर्गंधी इतकी भीषण आहे की, साक्षात विठ्ठलानेही तिथे नाक दाबूनच प्रवेश केला असता. नागरिक आजारी पडत आहेत, मुले घाणीत खेळत आहेत, पण महानगरपालिकेच्या साहेबांना याचे काय सोयरसुतक? ‘स्वच्छ भारत’च्या वल्गना करणाऱ्या या प्रशासनाचा बेशरमपणा पाहून अखेर स्थानिक महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाची ‘नाडी’ आवळली.
मक्तेदाराला ‘घाम’ फोडला!
रस्ता रोको आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत मक्तेदार राहुल आवळे यांना घटनास्थळी खेचून आणले. “शनिवारी सकाळी कर्मचारी लावून साफसफाई झालीच पाहिजे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे,” असा सज्जड दम भरल्यानंतरच आंदोलनाची धग शांत झाली.
या रणधुमाळीत मंजुनाथ भाविकट्टी, रवी पालेगार यांच्यासह विठ्ठलनगर आणि बालाजीनगरमधील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता तरी महानगरपालिकेचे डोळे उघडणार की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू राहणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
मीडियाचा फटका:
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एसी केबिनमध्ये बसून जनतेचे हाल दिसत नसतील, तर त्यांना एकदा विठ्ठलनगरच्या गटारी शेजारी जेवायला बसवावे! मग समजेल की सांडपाणी दारापर्यंत येणे म्हणजे काय असते!



























