पाणी येते की थुंकते ? गणेश नगरमधील रणरागिणींचा पालिकेच्या ढिम्म कारभारावर ‘हंडा’ मोर्चा !


नळाचा आकार मोठा, पण पाणी मात्र ‘बोटभर’; पाण्याचा दाब पाहून नळालाही घालावी लागतेय मान खाली !

 

इचलकरंजी : गजानन शिरगावे :

मँचेस्टर नगरी म्हणून गाजणाऱ्या इचलकरंजीत सध्या सुताच्या कांड्या फिरत असल्या तरी, गणेश नगरच्या गल्ली क्रमांक साडेतीनमध्ये मात्र पालिकेच्या नाकर्तेपणामुळे जनतेच्या नशिबी ‘कोरड’ आली आहे! गल्लीत नळाला पाणी येते, पण ते इतक्या लाचार आणि संथ गतीने की, “हे पाणी येते की थुंकते?” असा संतप्त सवाल येथील रणरागिणींनी प्रशासनाच्या तोंडावर फेकला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य मांडताना एक महिला म्हणाली, “अहो, नळाचा जो आकार आहे, त्या प्रमाणे तरी पाणी आले पाहिजे! पाण्याचा कमी दाब पाहून आता नळाला सुद्धा मान खाली घालावी लागते आहे!” प्रशासनाच्या या ‘थंडा’ कारभारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता हंडा मोर्चाचा पवित्रा घेतला असून, अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना घाम फोडला आहे.

प्रशासनाचा ‘दोन दगडावर हात’!

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या अन्यायाविरुद्ध स्थानिक महिलांनी मारुती बन्ने व संजय देसाई यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांना पाचारण करण्यात आले. शिरगावे यांनी घटनास्थळी पोहोचताच पाणीपुरवठा अधिकारी बाजी कांबळे यांना जाब विचारला, तेव्हा पालिकेच्या अजब नियोजनाचा ‘गजब’ नमुना समोर आला!

या भागात एक जुनी आणि एक नवीन अशा दोन पाईपलाईनचे जाळे पसरले आहे. अधिकारी महेश सोनवणे यांनी कबुली दिली की, दोन्ही पाईपलाईन सुरू असल्याने पाण्याचा दाब कमी होतोय. म्हणजे, प्रशासनाला साधे पाण्याचे नियोजन करता येत नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे!

आता आश्वासन नको, ‘धार’ हवी!

अखेर यावर तोडगा म्हणून जुनी पाईपलाईन बंद करून सर्व कनेक्शन नव्या पाईपलाईनवर घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, जोपर्यंत नळाला खळाळून पाणी येत नाही, तोपर्यंत या रणरागिणी शांत बसणार नाहीत. यावेळी मधुकर बेलेकर, रवी गुंडे, करपे टेलर, गैबू शेख यांच्यासह शकुंतला पाटील, मयुरी गवड, छाया सूर्यवंशी, फातिमा शेख, कमल सुतार, प्रभा हजारे, मीना पाटील या भगिनींनी प्रशासनाचा चांगलाच ‘पंचनामा’ केला.

बघूया, आता पालिकेचे हे कुंभकर्णी प्रशासन जागे होते की जनतेला पुन्हा एकदा आश्वासनांच्या कोरड्या विहिरीत ढकलते!

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!