इचलकरंजीची ड्रेनेजमुक्ती आता ‘टाटा’च्या चाकावर ; खासदारांच्या निधीतून आले घाण उपसणारे यंत्र!
इचलकरंजी शहर म्हणजे श्रमिकांची नगरी, पण या नगरीला ड्रेनेजच्या तुंबलेल्या प्रश्नाने अनेक दिवसांपासून हैराण केले होते. गल्लीबोळात साचणारे मैला पाणी आणि ड्रेनेजचे ब्लॉक काढताना प्रशासनाची दमछाक होत होती. अखेर खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या निधीतून महापालिकेला एक शक्तिशाली ‘सक्शन कम जेटींग मशीन’ बहाल केले आहे. टाटा कंपनीचे हे ‘७१२ एलपीटी’ मशीन म्हणजे आता शहरातील घाणीचा कर्दनकाळ ठरणार आहे!
या मशीनचे विधिवत पुजन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि शिवसेना गटनेते रवींद्र माने यांनी या यंत्राचे पूजन करून ते जनतेच्या सेवेत रुजू केले. हे मशीन केवळ यंत्र नाही, तर ड्रेनेजमधील गाळ आणि साचलेली घाण उपसणारा एक ‘आधुनिक बाहुबली’च आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.
या सोहळ्याला स्थायी समिती सभापती सतिश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, नगरसेवक योगेश पाटील, सयाजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता मशीन तर आले आहे, पण त्याचा वापर होऊन शहर खरोखरच ड्रेनेजमुक्त होते की केवळ ‘पुजन’च चर्चेत राहते, याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. यंत्राच्या आगमनामुळे पालिकेच्या ताफ्यात मोठे बळ मिळाले आहे, हे मात्र नक्की!


























