आकाशात ढगांचा गडगडाट, खिशात महागाईचा भडका ; अवकाळी पावसाचा सामान्यांना मोठा फटका !
सध्या निसर्गाचं वेळापत्रक आणि आपल्याकडचं राजकारण यात काहीच फरक उरलेला नाही. दोन्हीकडे कधी काय होईल, कोणाची सत्ता जाईल आणि कोणाचं ‘पीक’ कापलं जाईल, याचा भरवसा खुद्द विधात्यालाही राहिलेला नाही! निसर्गाचं चक्र म्हणजे एखाद्या पुण्यातल्या पी.एम.पी.एम.एल. बससारखं झालंय; कधी येईल आणि कधी वाटेतच दगा देईल, याचा नेम खुद्द स्टँडवरच्या ‘कंट्रोलर’लाही नसतो!
‘अवकाळी राजकारण’ आणि पावसाचा तडाका
खरं सांगायचं तर, अवकाळी पाऊस आणि आजचं ‘अवकाळी राजकारण’ आता एकसारखंच झालंय. राजकारणात जसा सकाळी झालेला शपथविधी दुपारी टिकेलच याची खात्री नसते, तसंच सकाळी पडलेलं लख्ख ऊन दुपारी कोसळणाऱ्या पावसाची हमी देऊ शकत नाही. इकडे आकाशात ढगांचे रंग बदलतात, तिकडे खाली नेत्यांचे पक्ष बदलतात! या दोन्ही ‘अवकाळी’ संकटांमुळे शेवटी सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या स्वप्नांचीच धुळधाण होते. निसर्गाचा अवकाळी पाऊस पिकांचं नुकसान करतो, तर हे ‘अवकाळी राजकारण’ जनतेच्या विश्वासाचं नुकसान करतं.
प्रशासनाचा ‘पाणीदार’ कारभार
पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडायच्या आधीच, आपल्या प्रशासनाची ‘पोलखोल’ मात्र खात्रीने होते. आपल्याकडची यंत्रणा म्हणजे कशी? ‘पाऊस पडल्यावर छत्री उघडणारे साहेब!’ शहरातल्या रस्त्यांवर जेव्हा गुडघाभर पाणी साचतं, तेव्हा महापालिकेच्या इंजिनिअर्सना अचानक साक्षात्कार होतो की—’अरेच्चा, नाल्यांची सफाई फक्त कागदावरच ‘पाणीदार’ झाली की काय!’ तिकडे शेतातलं पीक वाहून जातंय आणि इकडे शहरातली गटारं ओसंडून प्रेमाने वाहतायत. निसर्गाचा कोप हा कदाचित ‘दैवी’ असेल, पण मॅनहोलमध्ये फसलेली माणसं आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी हा मात्र पूर्णपणे ‘प्रशासकीय पराक्रम’ आहे!
युद्ध, महागाई आणि सामान्यांची ‘होरपळ’
त्यात भर म्हणून हे दूर कुठेतरी चाललेलं युद्ध! रशिया आणि युक्रेनमध्ये तोफेचा गोळा सुटला की, त्याचे चटके इकडे आमच्या महाराष्ट्रातल्या गृहिणीच्या फोडणीला बसतात. तिकडे रणगाडे धावतात आणि इकडे गॅसच्या टाकीचे भाव ‘बुलेट ट्रेन’च्या वेगाने धावायला लागतात. युद्धाचा हा तडाका आणि महागाईचा हा कहर… या कात्रीत सामान्य माणूस असा अडकलाय की, आता चहा उकळायला गॅसऐवजी स्वतःचा ‘तापलेला पारा’ वापरावा लागेल की काय, अशी भीती वाटते. खिशातल्या नोटा आता नुसत्या ‘प्रदर्शनीय’ वस्तू झाल्या आहेत की काय, असं वाटू लागलंय!
बळीराजाची व्यथा
पावसात भिजणं हे सिनेमातल्या हिरो-हिरॉईनला ‘रोमँटिक’ वाटत असेल, पण जो शेतात राबतो त्याला तो पाऊस काळजाला पडलेलं एक मोठं ‘भगदाड’ वाटतो. द्राक्षाच्या बागेत किंवा गव्हाच्या सोनेरी लोंब्यांवर जेव्हा हे अवकाळीचे ‘टपोरे थेंब’ पडतात, तेव्हा ते थेंब नसून त्या राबणाऱ्या हातांच्या डोळ्यांतलं पाणी असतं. पाऊस जेव्हा ऋतूत येतो तेव्हा ते ‘वरदान’ असतं, पण तो जेव्हा असा ‘अवकाळी’ येतो तेव्हा ते एक ‘अस्मानी संकट’ असतं.
थोडक्यात काय…
बाकी, पाऊस पडला की वाफाळलेला चहा असावा, हा आमचा अस्सल मध्यमवर्गीय स्वभाव आहेच. पण तो चहा पिताना जेव्हा चिखलात उभ्या असलेल्या त्या शेतकऱ्याचा चेहरा आठवतो, तेव्हा तो गोड चहा सुद्धा थोडा कडूच वाटायला लागतो. नियतीला आणि राजकारणाला एकच सांगावसं वाटतं— “बाबांनो, किमान ऋतूंच आणि तत्वांच तरी काहीतरी गणित पाळा, सामान्य माणसाला आणखी किती ‘व्याकुळ’ करणार ?”




























