मोदींच्या ‘गॅस’वर मुखेडात काँग्रेसचा चहा; अक्कल पाजळणाऱ्या ‘फेकू’ सरकारची काढली धिंड !


मोदींच्या ‘गॅस’वर मुखेडात काँग्रेसचा चहा ; अक्कल पाजळणाऱ्या ‘फेकू’ सरकारची काढली धिंड !

मुखेड | विशेष प्रतिनिधी

– जैनोदीन पटेल

‘अच्छे दिन’च्या गुलाबी स्वप्नांचा पाळणा हलण्याऐवजी आज देशात महागाईचा नरकासूर तांडव करत आहे! केंद्रातील मोदी सरकारने सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावत व्यावसायिक गॅसच्या दरात दोनशे रुपयांची भरघोस वाढ केली आणि गरिबांच्या जखमेवर मीठ चोळले. एकूणच या लुटारू धोरणांनी आज देशातील तमाम जनतेला रस्त्यावर आणले आहे! या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी आज मुखेडच्या रणमैदानात काँग्रेसने ‘एप्रिल फूल’चे औचित्य साधून मोदींच्या थापांचा फुगा फोडला आणि ‘फेकूदिन’ साजरा करत सरकारची धिंड काढली!

नालीतील गॅस आणि ‘फेकू’ चहाचा तमाशा !

पंतप्रधानांनी एकेकाळी ‘नालीतून गॅस काढून चहा करता येतो’ असे अगाध ‘ज्ञान’ पाजळले होते. त्यांच्या या अक्कल पाजळण्याच्या विधानाची चव आज मुखेडच्या जनतेला भररस्त्यात चाखायला मिळाली. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी चक्क नालीवर शेगडी मांडली! “पहा, तुमचा गॅस आला!” असा उपरोधिक टोला लगावत नालीच्या गॅसवर प्रतिकात्मक चहा उकळला आणि तो चहा जनतेला पाजला. मोदींच्या त्या विधानाची वाफ आज मुखेडच्या तहसील कार्यालयासमोर चांगलीच उडाली.

पागल मित्र ट्रम्प आणि ‘बुद्ध’ हवा !

या आंदोलनात केवळ स्थानिक महागाईच नव्हती, तर जागतिक राजकारणावरही अत्रेंच्या लेखणीला शोभतील असे ‘फटके’ मारण्यात आले. जगाच्या नकाशावर इराण, इस्रायल आणि अमेरिकेचे युद्ध पेटले आहे. यावर काँग्रेसने थेट मोदींच्या ‘मैत्री’वर निशाणा साधला. “सांगा तुमच्या त्या पागल मित्र ट्रम्पला- युद्ध नको, बुद्ध हवा!” अशा आशयाचे फलक हातात धरून कार्यकर्त्यांनी मोदींच्या जागतिक प्रतिमेची लक्तरे वेशीवर टांगली. “तुमच्या मित्राला युद्ध थांबवायला सांगा, ज्यामुळे भारतात महागाईचा भडका उडाला आहे,” असा जळजळीत सल्ला संभाजी पाटील उंद्रीकर यांनी यावेळी दिला.

जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद !

या उपरोधिक आंदोलनाला मुखेडकरांनी प्रचंड गर्दी केली होती. गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नागरिकांनी रांगेत उभे राहून तो चहा घेतला. केवळ घोषणाबाजी न करता मोदी सरकारच्या धोरणांमधील फोलपणा काँग्रेसने चव्हाट्यावर आणला.

यावेळी सुनील आरगिळे, भाई असद बल्की, प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे, राजुभाऊ बनसोडे यांच्यासह काँग्रेसच्या फौजेने “कहा गये अच्छे दिन?” असा सवाल करत गॅस दरवाढीच्या चितेवर सरकारची अब्रू टांगली.

थोडक्यात काय तर… कालपर्यंत गॅसच्या बाटलीवर ‘सबसिडी’ची गाजरं दाखवणारे हे सरकार आज सामान्यांच्या घराची चूल विझवायला निघाले असून, जनतेची अन्नाची भ्रांत करून त्यांना रस्त्यावर आणण्याचे पाप या सरकारने केले आहे, हेच या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!