उन्हाळा की यमराजाचा फेरा..? जागतिक बँकेने वाजवली धोक्याची घंटा; वातानुकूलित यंत्रात बसणाऱ्यांनो, बाहेर सामान्यांचा ‘कोळसा’ होतोय !


उन्हाळा की यमराजाचा फेरा..? जागतिक बँकेने वाजवली धोक्याची घंटा; वातानुकूलित यंत्रात बसणाऱ्यांनो, बाहेर सामान्यांचा ‘कोळसा’ होतोय!

लेखक:  मेहबूब सर्जेखान ज्येष्ट संपादक 

जागतिक बँकेचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल वाचला आणि वाटलं, आता माणसाने ‘माणूस’ म्हणून जगावं की निसर्गाच्या या धगधगत्या भट्टीत ‘कोळसा’ होऊन जावं? या अहवालानं दिलेला इशारा केवळ गंभीर नाही, तर तो आपल्या विनाशाची नांदी आहे. २०५० सालापर्यंत शहरांमधील गरीब जनतेला वाढ  त्या उष्णतेचा फटका तब्बल ७०० टक्क्यांनी अधिक बसणार आहे. ७०० टक्के? ही आकडेवारी वाचूनच अंगाचा थरकाप उडतोय. आपण प्रगतीची स्वप्नं पाहत असताना हा उन्हाळा साक्षात यमराजाचा फेरा घेऊन दारात उभा आहे.

सिमेंटची जंगलं की मृत्यूचा सापळा?

आज आमची शहरं ही शहरं उरलेली नाहीत, तर ती ‘नागरी उष्णता बेटे’ झाली आहेत. विकासाच्या नावाखाली आम्ही वृक्षांची कत्तल केली आणि त्या जागी सिमेंटचे उंच इमले उभे केले. यामुळे शहरांमधील तापमान ग्रामीण भागापेक्षा अनेक अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. वातानुकूलित यंत्रांच्या गारव्यात बसणाऱ्यांना बाहेरच्या जगाचं भान उरलेलं नाही. पण ज्यावेळी हे यंत्रांचे गारवे बंद होतील, त्यावेळी समजेल की आपण स्वतःच स्वतःसाठी एक मृत्यूचा सापळा तयार केला आहे.

कष्टकऱ्यांच्या घामाची किंमत काय?

अहवाल सांगतो की, उष्णतेमुळे उत्पादकता घटणार आणि कामाचे तास कमी होणार. अहो, जो मजूर उन्हात राबतो, जो कष्टकरी रस्त्यावर घाम गाळतो, त्याच्या उत्पन्नावर हा थेट घाला आहे. अन्नासाठी वणवण करणाऱ्या गरिबाच्या ताटात आता या उष्णतेमुळे अन्नाऐवजी केवळ ‘वाफ’ उरेल की काय, अशी भीती वाटते. आरोग्याच्या समस्या इतक्या वाढतील की रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडतील.

शहाणपण आणि उपाययोजना

जागतिक बँकेने काही उपाय सुचवले आहेत – झाडं लावा, पांढरी छतं करा, घरांची रचना निसर्गाला पूरक ठेवा. हे सल्ले ऐकायला सोपे वाटतात, पण आमचं प्रशासन आणि नागरिक हे गांभीर्याने घेणार का? रस्ते रुंद करताना हजारो झाडांची कत्तल करताना आमचे हात थरथरत नाहीत. जर आज आपण ही झाडं वाचवली नाहीत, तर उद्याची पिढी केवळ चित्रातच झाडं बघेल आणि प्रत्यक्ष जगात उष्णतेच्या झळा सोसेल.

आजची कृती, उद्याचं रक्षण!

पण अजूनही वेळ गेलेली नाही. जर आपण आजपासूनच जोमाने वृक्षारोपण करायला सुरुवात केली, तर २०५० साल उजाडेपर्यंत हीच झाडं डेरेदार वृक्ष होऊन आपल्याला आणि आपल्या शहरांना शितल सावली देतील. आज लावलेले छोटेसे रोपटे २०५० मध्ये एखाद्या महावृक्षासारखं उभं राहून या उष्णतेच्या संकटापासून आपलं रक्षण करेल. हे केवळ सरकारी काम नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून एक झाड लावून ते जगवले पाहिजे. आजची छोटीशी गुंतवणूक उद्याच्या पिढीसाठी मोफत ‘वातानुकूलन’ ठरणार आहे.

वेळीच सावध व्हा!

स्थानिक प्रशासन आणि सरकारला माझा सडेतोड सवाल आहे – साहेब, तुमचे हे सिमेंटचे रस्ते आणि काचेच्या इमारती माणसांना सुख देणार की त्यांना जिवंतपणी जाळणार? उष्णतेमुळे होणारे स्थलांतर आणि वाढती असमानता हा केवळ सामाजिक प्रश्न नाही, तर तो उद्याचा महाप्रलय आहे. वेळीच शहाणे व्हा, निसर्गाशी जुळवून घेणारी पायाभूत सुविधा उभारा, अन्यथा या धगधगत्या विस्तवावर आपल्या सर्वांची ‘खापरपंजिका’ झाल्याशिवाय राहणार नाही!

सावध व्हा, झाडं लावा आणि निसर्ग वाचवा; कारण वेळ खूप वेगाने सरकते आहे!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!